मुंबई - वादग्रस्त ठरलेले मेट्रो-3 कारशेड अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मेट्रोचे कारशेड आरेमधून रॉयल पाममध्ये हलवण्यात येणार आहे. याबाबत 'सेव्ह आरे'च्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रॉयल पामची जागा सरकारने का कारशेडसाठी निवडली याबाबत खुलासा करण्याची मागणी आरे बचावडून होत आहे.
आरेत कारशेड उभारणीला शिवसेनेने विरोध केला होता. आता हे कारशेड आरेपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या रॉयल पाममध्ये हलवण्याची तयारी सुरू आहे. आरेतील कारशेडला विरोध होत असताना रॉयल पामने काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. कारशेडसाठी रॉयल पामचा विचार करण्यात यावा, असे रॉयल पामकडून पत्रात नमूद करण्यात आले होते. असेच एक पत्र रॉयल पामने वनशक्ती या आरे संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेलादेखील पाठवले होते. रॉयल पाम प्रायव्हेट लिमिटेडच्या महाव्यवस्थापकांनी कारशेडसाठी 30 ते 60 एकर जागा देण्याचे ठरवल्याने याबाबत सांशकता व्यक्त होते आहे.
उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या प्रकरणी त्यांनी पाच सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने कारशेडसाठी कांजूरमार्गचा पर्याय सुचवला. मात्र, त्यामुळे खर्चात कोट्यवधींची वाढ होणार असल्याने हा पर्याय मागे पडला. मात्र, आता आरेतील रॉयल पामच्या जागेचा विचार होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून हा निर्णय विकासकाच्या फायद्यासाठी तर घेतला जात नाही ना अशी चर्चा सुरू आहे.
हेही वाचा - 'झाडा'झडतीला तयार; चौकशी करण्यासाठी माजी वनमंत्री स्वतः देणार पत्र