मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे झालेल्या शपथविधी सोहळ्याच्या हायव्होल्टेज ड्रामामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा डाव होता. हे आता खुद्द पवारांनी मान्य केल्यामुळे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर दुटप्पी खेळ केल्याच्या आरोपाला उत्तर देताना शरद पवार यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली. 2019 च्या सत्तासंघर्षात देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या गुगलीवर त्यांची विकेट गेली, असे शरद पवार यांनी गुरुवारी सांगितले. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीबाबत जे सांगितले ते खरे आहे. पण पवारांच्या गुगलीवर देवेंद्र फडणवीसच बोल़्ड झाले होते. पवारांना समजून घेण्यासाठी भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील - संजय राऊत, खासदार, ठाकरे गट
वाद कसा सुरू झाला - पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांचा डाव होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच आमच्यासोबत सरकार स्थापनेसाठी पवारांसोबत बैठक झाली होती. मात्र, त्यानंतर पवारांनी माघार घेत डाव पलटवला, असे फडणवीस म्हणाले. त्यावर पवारांनी स्पष्टीकरण दिले होते. मी जर निर्णय बदलला होता तर तुम्ही शपथविधी का केला? माझा तर पाठिंबा असता तर ते सरकार दोन दिवसात कोसळले कसे? असा प्रश्न पवारांनी विचारले. तसेच माझ्या गुगलीवर फडणवीसच बोल्ड झाल्याचे पवार यांनी सांगितले.
शरद पवारांनी खरे सांगितले - शरद पवारांच्या पत्रकार परिषदेविषयी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, शरद पवारांनी जे सांगितले ते शंभर टक्के सत्य आहे. त्यावेळी राष्ट्रपती राजवट कधी निघेल याबाबत आम्ही चिंतेत होतो. तिन्ही पक्षांचे एक मत होते की बहुमताचा आकडा सिद्ध केला तरीही राज्यपाल बहुमत मानणार नाहीत. आपल्याला झुलवत ठेवतील, बहुमत मान्य करणार नाहीत. मग, एका भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट उठविली गेली आणि महाविकास आघाडीच्या सरकारचा मार्ग मोकळा झाला. त्यावेळी पवारांनी एकाचवेळेला गुगली आणि सिक्सर दोन्ही मारले होते. पवारांना समजून घेण्यासाठी भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील हे मी आजही म्हणतो. पवारांनी गुगली टाकली नसती तर ती राष्ट्रपती राजवट उठली नसती. वेगळे खोके सरकार निर्माण झाले असते. त्या गुगलीला देवेंद्र फडणवीस यांचा क्लीन बोल्ड झाला.
खंजीर खुपसण्याला एक वर्ष - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, राज्य मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. यावर मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही या सरकारकडे सरकार म्हणून पाहतच नाही. महाराष्ट्राच्या फसवणुकीला एक वर्ष झाले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेनेच्या पाठीवर खंजीर खुपसण्याला एक वर्ष झाले आहे. उचापती करून घटनाबाह्य सरकार स्थापन झालेल्या सरकारला एक वर्ष झाले. या सरकारविषयी आमचे एकच मत आहे. हे फसवणुकीचे एक वर्ष आहे.
गृहमंत्र्यांवर निशाणा - अनेकांनी या सरकारला सकस सरकार म्हटले. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, सकस फक्त चाळीस आमदार झाले. राज्य अनेक संघर्षातून जात आहे. कायदा व सुव्यवस्थेपासून बेरोजगारीपर्यंत अनेक प्रश्न आहेत. पुण्यासारख्या जिल्ह्यातून अनेक मुली गायब झाल्या. त्यांची हत्या करण्यात आली. अनेक महिलांवर हल्ले झालेत. याला सकसपणाची लक्षणे म्हणत नाहीत. पालिकेची निवडणूक तुम्ही दोन वर्ष घेऊ शकला नाही म्हणजे किती सकसपणा असेल? हजारच्या आसपास मुली ठाणे, पुणे, मुंबई, खानदेश येथून गायब झाल्या. हे लक्षण कसले आहे? राज्याचे गृहमंत्री इतर सर्व विषयांवर वायफळ चर्चा करतात पण गृहमंत्री म्हणून त्यांचा कारभार हा अत्यंत अयशस्वी आहे.
मुंबईत मोर्चा - शनिवारी 1 जुलै रोजी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात ठाकरे गटाचा मोर्चा आहे. या मोर्चाविषयी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, शनिवारी सायंकाळी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानपर्यंत हा मोर्चा असणार आहे. मोर्चाचे नेतृत्व आदित्य ठाकरे करतील. या मोर्चात प्रचंड संख्येने मुंबईतून लोक सामील होतील. अनेक विषय आदित्य ठाकरे यांनी मांडले. परंतु, सरकारला जाग येत नाही. शनिवारचा मोर्चा मुंबईकरांची ताकद दाखविणारा असेल.
पहाटेच्या शपथविधीच्या सर्व बातम्या वाचा येथे -