मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व मुंबई या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या घराचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे तीन महिन्याचे बिनव्याजी अग्रिम वेतन (आगाऊ वेतन) व खास रजेची मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी एसटी महामंडळाकडे केले आहे. याबाबात निवेदनही एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना दिले आहे.
महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले की, 14 मे ते 18 मे 2021 रोजी तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व मुंबई या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे घरांचे तसेच स्थावर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचे बिनव्याजी अग्रिम वेतन देण्याबाबत कामगार करारात तरतूद आहे. यापूर्वीही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. नैसर्गिक आपत्तीने बाधित एसटी कर्मचाऱ्यांना संदर्भाधीन परिपत्रकानुसार अटी व शर्तींच्या अधिन तीन महिन्याचे मुळ वेतन व महागाई भत्ता आगाऊ (एॅडव्हान्स) बिनव्याजी अदा करण्याची तरतूद आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनाकडून मागणी करण्यात आली आहे. कोरोना काळात एसटी महामंडळाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कटलेले असून त्यात आजून भर म्हणजे 14 ते 18 मे च्या नैसर्गिक चक्रीवादळामध्ये एसटी कर्मचारी भरडला गेला आहे. त्यामुळे तीन महिन्याचे आगाऊ बिनव्याजी वेतन भेटल्याने मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - राज्यात बुधवारी 34 हजार 031 नवे कोरोनाबाधित; 51 हजार 457 कोरोनामुक्त