मुंबई - राज्य सरकारने मराठा समाजाला 3 हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून (EWS) आरक्षण मिळेल असा निर्णय महाभकास आघाडीने घेतला. ही आघाडी कर्तव्यशून्य आहेच, पण कर्तृत्वशून्य हा त्यांचा परिचय आहे. आता कर्तृत्व परावलंबी आहेत हे सिद्ध झाले. कारण 10 टक्के EWS आरक्षण दिले, त्यात ठाकरे सरकारचं कर्तृत्व काय? ते मोदी सरकारने दिले आहे. त्यामुळे हे ठाकरे सरकार कर्तृत्वावरही परावलंबी आहे, असा हल्ला आशिष शेलार यांनी केला.
मराठा विद्यार्थ्यांना ओबीसीच्या सुविधा द्या -
गायकवाड आयोगाने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल सिद्ध करुन मराठा आरक्षण मिळाले. मात्र, आघाडी सरकारने EWS आरक्षण जाहीर केले. जोपर्यंत मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहील. EWSमध्ये टाकल्यामुळे मराठा समाज आर्थिक दुर्बल नाही, अशी मांडणी ठाकरे सरकारने करू नये. ओबीसी प्रवर्गाला मिळणाऱ्या सुविधा मराठा विद्यार्थ्यांनाही मिळाव्या, यासाठी 3 हजार कोटीचं पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा - अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्यांना चाप.. सरकारकडून कोरोनावरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांचे दर निश्चित
शिवसेनेकडून मराठा मोर्चाची खिल्ली -
शिवसेनेने भावनाशून्यपणे मराठा मोर्चाची खिल्ली उडवली होती. गायकवाड आयोगाची बाजू मांडली नाही यावरुन ते कर्तव्यशून्य होते हे सिद्ध झाले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण स्थगिती नाकारली. त्या गायकवाड आयोगाला तुम्ही गाळात टाकले. आता मराठा समाजाला आर्थिक मागासलेपणमध्ये टाकले असले, तरी सामाजिक मागासलेपण गाळू नका, अशी मागणी शेलार यांनी मविआ सरकारकडे केली.