मुंबई - वडाळा येथील एका महिलेने तिच्या प्रियकराची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत पडल्यानंतर पोलिसात तक्रार करून अनधिकृत शस्त्र बाळगल्या प्रकरणी त्याला अटक करवली. वडाळा पोलिसांनी या प्रकरणात शमशाद अली सिद्दीकी उर्फ हंटर (32) या आरोपीला त्याचे इतर तीन साथीदार कुंदन गोपालसिंग नेगी (39) साकीब हमीद गिरगावकर (42) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एका विदेशी पिस्तूलासह, 5 जिवंत काडतुसे आणि एक चाकू हस्तगत केला आहे.
वडाळा परिसरातील अँटॉप हिल परिसरात राहणाऱ्या एका महिलेची काही दिवसांपूर्वी तिच्याच परिसरात राहणाऱ्या शमशाद अली सिद्दीकी या युवकाशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर शमशाद याचे महिलेच्या घरी येणे-जाने सुरू झाले होते. 8 मार्चला रात्रीच्या वेळेस आरोपी शमशाद हा महिलेच्या घरी आला. त्याने त्याच्या जवळची लाल पिशवी कपाटात ठेवून ती पिशवी उघडून न बघण्याचे सांगितले. मात्र, पिशवीत असलेल्या वस्तूंबद्दल पुन्हा विचारणा केल्यावर आरोपी शमशाद याने स्वतःजवळ लपवलेले विदेशी बनावटीची पिस्तुल आणि 5 जिवंत काडतुसे बाहेर काढून पिशवीत ठेवली. यानंतर काही वेळातच बाहेर जाऊन पुन्हा येतो असे, म्हणून आरोपी शमशाद बाहेर निघून गेला.
हेही वाचा - शिमगा संपला, त्यामुळे सरकार पाडण्याचा मुहूर्त विरोधकांकडे नाही'
आपल्या प्रियकराच्या गुन्हेगारी वृत्तीबद्दल माहिती झाल्यानंतर घाबरलेल्या महिलेने या बद्दल तिच्या भावाला सांगितले. निलोफर आणि तिच्या मोठ्या भावाने या बद्दल वडाळा पोलिसांना फोनवर माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता पिस्तुल, काडतुसे आणि चाकू हस्तगत केले. आरोपी शमशाद अली सिद्दीकी उर्फ हंटर (32)या आरोपीला त्याच्या तीन साथीदारांसह अटक केली. अटक आरोपींवर मुंबई , ठाणे परिसरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरी, खंडणी, मारामारी आणि अवैध शस्त्र बाळगण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.