मुंबई - व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी देणाऱ्या गँगस्टर प्रसाद पुजारी याची आई इंदिरा पुजारीला अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी पुजारीचा मावस भाऊ असलेल्या खास हस्तकाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील उडपी येथून अटक केली होती. त्यानंतर केलेल्या तपासात इंदिरा पुजारी (62)ला 10 लाख रुपयांच्या खंडणी गुन्ह्यात अटक केली.
डिसेंबर 2019 मध्ये मुंबईतील विक्रोळी परिसरात शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखावर गोळीबार करण्यात आला होता. या नंतर खंडणीसाठी एका व्यावसायिकालाही धमकावण्यात आले होते. खंडणी दिली नाही, तर विक्रोळीत झालेला गोळीबार तुझ्यावर करू, अशी धमकी प्रसाद पुजारीने या व्यावसायिकाला दिली. त्यामुळे पीडित बांधकाम व्यावसायिकाने याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात गुन्हे शाखेने प्रसाद पुजारीच्या हस्तकाला मोक्का अंतर्गत अटक केली होती.
हेही वाचा - काँग्रेस जुन्यांच्याचं कोंडाळ्यात! नव्या नेतृत्त्वाला संधी द्यावी - शिवसेना
अटक आरोपीच्या बँक खात्यावर मंगळूरातील गोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून 25 हजार रुपये भरण्यात आले होते. हे पैसे खंडणीसाठी धमकवण्यात येणाऱ्या कामासाठी देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी कुथियार, उडपी, कर्नाटक येथून मुंबईत प्रसाद पुजारीच्या हस्तकासोबत समन्वय साधणाऱया सुकेश कुमार सुवर्णा (28) याला अटक करण्यात आली. सुवर्णा हा मुंबईतील प्रसाद पुजारी गँगच्या गुंडांना त्यांनी केलेल्या कामाचे पैसे मागील काही वर्षांपासून पुरवत होता. मात्र, सुकेश सुवर्णा याला हे पैसे गँगस्टर प्रसाद पुजारीची आई देत असल्याचे पोलीस तापासात समोर आल्याने इंदिरा पुजारीला मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली आहे.