मुंबई : Ganesh Visarjan: प्रदूषण हा संपूर्ण जगासमोरील मोठा प्रश्न आहे. यात स्थानिक पातळीवर प्रशासनाने, सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम घ्यावेत आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करावं, असं नेहमीच बोललं जातं. मात्र आता या पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी पालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जनाप्रसंगी होणारे प्रदूषण हा एक मोठा चर्चेचा विषय आहे. यावर एक उपाय म्हणून पालिकेने आता गणपती 'विसर्जना ऐवजी दान करा' या उपक्रमाला यावर्षीपासून सुरुवात केली आहे.
गणेशमूर्ती दानाचा अभिनव उपक्रम : पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे गणेशभक्तांचा कल वाढला आहे. मुंबई महानगरपालिकेमार्फत यंदा गणेशमूर्ती दानाचा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. मुंबईत या उपक्रमा अंतर्गत 12 विविध ठिकाणी पालिकेमार्फत गणपती बाप्पाच्या मूर्तीचे संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी गणेश मूर्तींचं विसर्जन तलाव, नदीपात्र किंवा समुद्रात न करता गरजूंना किंवा आदिवासी गावातील पाडे व रस्त्यांवरील इच्छुक भाविकांना पूजनासाठी दान करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
बाप्पाची मूर्ती विसर्जनाऐवजी दान करा : अनंत चतुर्दशी दिवशी (Anant Chaturdashi 2023) हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. ज्या गणेश भक्तांना बाप्पाची मूर्ती विसर्जनाऐवजी दान करण्याची इच्छा असेल त्यांनी या संकलन केंद्राशी संपर्क करण्याचं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. यंदा अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण पूरक आणि समाज उपयोगी संदेश देणारे देखावे साकारण्याचा प्रयत्न केला. अनेक मूर्तिकारांनी यावर्षी स्वतःहून पालिकेला संपर्क साधत शाडूच्या मातीची मागणी केली. त्यामुळे यंदा पर्यावरण पूरक मूर्तींची संख्या ही वाढली आहे, अशी माहिती पालिकेने दिली.
मुंबईत गणपती विसर्जन सोहळा : मुंबईत दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहात होतं. हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील कानाकोपऱ्यातून गणेशभक्त मुंबईच्या चौपाट्यांवर येत असतात. त्यामुळे कोणतीही गैरसोय होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिकादेखील सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यावर्षी पालिकेचे 10 हजार कर्मचारी, जीवरक्षक,71 नियंत्रण कक्ष तसेच प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, प्रसाधन केंद्र आणि विविध सुविधांची व्यवस्था केल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा -