मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. बुधवारी मोठ्या भक्तीभावाने पाच दिवसांच्या बाप्पांना भक्तांनी निरोप दिला. नैसर्गिक व कृत्रिम अशा विसर्जन स्थळांवर बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत 19,080 गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी 10,296 मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. मुंबईत यंदा दीड दिवसाच्या 50 टक्क्यांहून अधिक मुर्त्या कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या होत्या.
मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शनिवारी २२ ऑगस्टला सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. मोठ्या भक्तीभावाने बाप्पांचे आदरातिथ्य केल्यावर बुधवारी जड अंतःकरणाने भाविकांनी पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. रात्री 12 वाजेपर्यंत 19,080 गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यात 518 सार्वजनिक, 18,549 घरगुती तर 13 गौरी मूर्तींचा समावेश आहे. एकूण 19,080 पैकी त्यापैकी 10,296 मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. विसर्जनादरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.