मुंबई - कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यासह देशातील आदिवासी आणि दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी देशभरात विविध सरकारी आणि खासगी संस्थांकडून अनेक पर्याय समोर आणले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण मिळावे म्हणून गेमीफाईड लर्निंग नावाची एक शिक्षण पद्धती सध्या शिकवली जात आहे. या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. राज्यात आज हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना गेमीफाईड लर्निंग शिक्षण पद्धतीचा आधार मिळत असून यामुळे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे.
केंद्र सरकारच्या आदिवासी विभागाच्या अंतर्गत देशातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाला विविध पर्याय दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ४०० हून अधिक आयआयटी, शिक्षण तज्ज्ञांनी स्टेप अप हे एक स्टुडंट टॅलेंट एनहान्समेंट प्रोग्रामचे लर्निंग अॅप्लिकेशन तयार केले आहे. याच माध्यमातून गेमीफाईड लर्निंग ॲपचे नवीन शिक्षण दिले जात आहे. या शिक्षणात गणित, विज्ञान आणि भाषा विषय ही अत्यंत आनंददायी आणि सतत प्रोत्साहन मिळेल असे धडे दिले जातात. त्यासाठी तशी रचना करण्यात आली आहे. एखादी संकल्पना समजून देण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पर्याय देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचे सहजपणे आकलन होते, अशी माहिती राज्यात स्टेपचे प्रवीण त्यागी यांनी दिली.
आम्ही या नवीन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांनही अधिक सक्षम करत आहोत. पिढ्यांपिढ्या जे विद्यार्थी गुणवत्ता नाही म्हणून मागे राहतात, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचा हा एक प्रयत्न असल्याचेही त्यागी यांनी यावेळी सांगितले.
देशातील २१ राज्यांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना ही त्यांच्या भाषेतील शिक्षण यातून मिळत असून महाराष्ट्रात आदिवासी विभागाकडून 14 एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कूल्समध्ये लवकरच हे स्टेपचे शिक्षण दिले जात असल्याचे त्यातून हजारो विद्यार्थ्यांना फायदा असून हे शिक्षण लवकरच पालघर, नंदुरबार, गडचिरोली आदी आदिवासी बहुल जिल्ह्यातील २५ हून अधिक एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले. नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना या गेमीफाईड लर्निंग शिक्षणाचा खूप चांगला फायदा होत आहे. गुणवत्ता नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये एक मोठ्या प्रमाणात भीती होती, ती आता दूर झाल्याने त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्यातील एकलव्य स्कूलचे शिक्षक सत्यश्री राव यांनी दिली