मुंबई : मुंबईमध्ये जी20 साठी आलेल्या पाहुण्यांचे जोरदार ( guests of the G20 group were welcomed ) ढोल ताशांच्या गजरात तसेच लावणी, कोळी गीतांनी स्वागत करण्यात आले. यामुळे भारावून गेलेल्या पाहुण्यांनी स्वतः गिरगांव चौपाटीवर नृत्यात सहभाग ( participated in dance at Girgaon Chowpatty ) नोंदवला. जी20 परिषद विकास कार्यगटाच्या बैठकांना कालपासून मुंबईमध्ये सुरूवात झाली. त्यानिमित्त मुंबई दौऱ्यावर आलेले परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत ( Indias Sherpa Amitabh Kant of Council ) यांनीसुद्धा काल कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन : देश-विदेशातून आलेल्या जी 20 विकास कार्यगटाच्या पाहुण्यांसाठी मुंबईतील हॉटेल ताज महाल पॅलेस येथे काल संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जी–20 परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत, मुख्य सचिव, जी-20 परिषदेचे पाहुणे यावेळी उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले गेले. गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय झाली. जी-20 गटाच्या पाहुण्यांचे आगमन होताच फेटे बांधून त्यांचे पारंपरिक स्वागत करण्यात आले. 'मराठी' परंपरेची ओळख सांगणारी ध्वनिचित्रफित त्यांना दाखविण्यात आली. माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आदी यावेळी उपस्थित आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाची संकल्पना वसुधैव कुटुंबकम असून जी-20 परिषद 13 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जी-20 च्या प्रतिनिधींना आणि बैठकांसाठी येणाऱ्या पाहुण्यांना संपूर्ण वर्षभर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि समृद्ध वारसाचे दर्शन होणार आहे. महाराष्ट्राचा संपन्न वारसा, महाराष्ट्रातील संस्कृती, महाराष्ट्रातील वेगवेगळया परंपरा, वाटचाली आणि प्रगतीची माहिती याबरोबरच राज्यातील सांस्कृतिक कलेची ओळख जी-20 परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांना व्हावी यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील लोककलांवर आधारीत गेट वे ऑफ इंडिया येथील हॉटेल ताज पॅलेस येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर गेट वे ऑफ इंडियाजवळ विशेष लाईट शोचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी पुणेरी ढोल पथकाने सादरीकरण केले.
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि जाज्वल्य स्वाभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राच नव्हे तर भारताची ओळख छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय अपूर्ण आहे. म्हणूनच जी 20 कार्यगटाच्या देशी विदेशी पाहुण्यांना लोककलेच्या माध्यमातून आमच्या महान राजांची थोरवी अंशत: का होईना ऐकवली असे ट्विट या कार्यक्रमाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच नयनरम्य लाईट शो आणि तिरंग्यात उजळून निघालेली 'गेट वे ऑफ इंडिया'ची वास्तू पाहून जी 20 कार्यगटाचे पाहुणे जणू हरखून गेले. रात्रीच्या समयी अरबी समुद्रतटी केलेली सैर पाहुण्यांना मुंबईची न्यारी ओळख दाखवणारी ठरली, असेही ते म्हणाले.
अमिताभ कांत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट : जी २० परिषद कार्यगटाच्या बैठकांना कालपासून मुंबईत सुरूवात झाली. त्यानिमित्त मुंबई दौन्यावर आलेले परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी काल स्वागत कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जी २० परिषदेच्या विविध बैठका आणि त्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. मुंबईतील पहिल्या बैठकीच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कांत यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.