मुंबई - ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्यावर आज संध्याकाळी 6 वाजता शासकीय इतमामात विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांची पत्नी मधुरा, मुलगा सारंग, मुलगी दुर्गा व निकटवर्तीय उपस्थित होते.
17 ऑगस्टला अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. आज त्यांचे पार्थिव मुंबईमध्ये आणण्यात आले. आज सकाळपासून संगीतप्रेमी, आप्तेष्ट व संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी पंडित जसराज यांच्या अंधेरीतील राहत्या घरी अंतिम दर्शन घेतले.
पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण या तिन्ही पद्म पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले शास्त्रीय गायक होते. पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी भोपाळमध्ये झाला होता. जसराज हे लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांचे मोठेभाऊ पंडित मणिराम यांनी त्यांचा सांभाळ केला. लहान वयातच जसराज यांनी गाण्यावर प्रभुत्व मिळवले. भारतासह अमेरिका, कॅनडा येथे त्यांचे अनेक शिष्य आहेत. अनेक मान्यवरांनी पंडित जसराज यांच्या निधनाने शोकाकुल प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
जसराज यांच्या सन्मानार्थ इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल यूनियनने (आयएयू) 11 नोव्हेंबर 2006 रोजी मंगळ आणि गुरु ग्रहांदरम्यान सापडलेल्या लघुग्रहाला पंडित जसराज यांचे नाव दिले होते.