मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी या प्रसंगी महाराष्ट्रातील जनतेला बाबासाहेबांच्या १३२ व्या जयंती दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, या आयोजनाने आज आनंद झाला आहे. अनेक देशात उत्सव साजरा केला जात आहे. महापालिकेला या आयोजनासाठी धन्यवाद. बाबासाहेबांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. मुंबई, महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी राहिली आहे. त्यांनी मानवी हितासाठी अनेक आंदोलने केली. इंदू मिलच्या जागी ऐतिहासिक स्मारक उभे राहील.
जगाला हेवा वाटेल असे स्मारक: या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज सर्व ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. इंदू मिल इथे बाबासाहेबांचे स्मारक होत आहे त्याला मी मुख्यमंत्री झाल्यावर दोनदा आढावा घेतला आहे. आता काही कमी होणार नाही. राज्य शासनाच्या वतीने बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच २२ हजार कोटी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. जगाला हेवा वाटेल असे स्मारक करायचे आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात देशात अर्थव्यवस्था ११ वरून ५वर आली. त्यासाठी बाबासाहेबांचे संविधान मार्गदर्शक ठरले असल्याचे शिंदे म्हणाले. बाबासाहेबांच्या नावाचे पुरस्कार तात्काळ सुरू केले जातील असेही त्यांनी सांगितले आहे.
धर्म, ग्रंथापेक्षा संविधान मोठे आहे: याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठल्याही धर्म, ग्रंथापेक्षा संविधान मोठे आहे. भारत अत्यंत वेगाने विकसित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा मोलाचा वाटा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाज सुधारक होते. त्यांनी 'प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी' हे १०० वर्षांपूर्वी पुस्तक लिहिले. ते आज समाजाला अवगत होत आहे. काही लोक स्वतःला मोठे समजत होते. जन्माने कोणी मोठे नाही तर कर्माने मोठे व्हा. बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने चालायला पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना इंदू मिलचे स्वप्न पूर्ण करता आले. बाबासाहेबांच्या लंडन मधील घराचा लिलाव होता तेव्हा महाराष्ट्र सरकारने ते घर विकत घेतले. तिथे एक संग्रहालय सुरू केले आहे. त्याला अधिकृत मान्यता भेटली आहे. ड्रॅगन पॅलेसमध्ये १५० कोटींचा प्लान तयार करत आहोत.
हेही वाचा: Asad Ahmed Cremation: चकमकीत ठार केलेल्या असद अहमदवर आज होणार अंत्यसंस्कार, तयारी सुरू