मुंबई: महाराष्ट्रात भाजपचे सर्वाधिक आमदार निवडुण आले मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंंग्रेस या तीन पक्षांनी एकत्र एत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन केले. याची सल भाजपला सुरवाती पासून आहे. हे तीन पक्षांचे सरकार फारकाळ टिकणार नाही अशी टिका भाजपचे नेते कायम करत आले आहेत. भाजपने इतर राज्यात केलेला ऑपरेशन लोटसचा प्रयोग महाराष्ट्रात होणार का हा कायम चर्चेचा विषय असतो. गेल्या काही दिवसात राज्यातील राजकारण तापत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर वेगवेगळ्या कारवाया सुरु आहेत. आरोप प्रत्यारोपाने सगळे वातावरण ढवळुन निघाले आहे.यातच झालेल्या 5 राज्यातील निवडणुकांत 4 राज्यात भाजपला जोरदार यश मिळवले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपला गोव्यात यश मिळाले त्यामुळे त्यांचेही पक्षातील स्थान आणखी बळकट झाल्याची भावणा आहे. एकुणच भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. आणि भाजपचे पुढचे टार्गेट हे महाराष्ट्रच आहे हे भाजपचे नेते तसेच फडणवीस यांच्या बोलण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा मुसंडी मारत विजय प्राप्त केला आहे. २५५ जागा मिळवून बहुमत मिळवले तर गोव्यातही २० जागा मिळवत बहुमताचा आकडा जवळपास गाठला. या दोन्ही राज्यांमध्ये झालेल्या या निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर परिणाम होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांनाही वाटते. त्यामुळे 'महा विकास आघाडीतही धाकधूक वाढली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी या दोन्ही राज्यात निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावले होते. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची पडझड थांबली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सारख्या पक्षांना आपले डिपॉझिटही वाचवता आले नाही. यामुळे भाजपला आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांना अधिक बळ मिळाले असून ते त्वेषाने महा विकास आघाडी सरकारवर वार करू लागले आहेत. सरकार अस्थिर करण्याची एकही संधी भाजप गमावताना दिसत नाही. हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करू शकेल असा दावा सरकारकडून होत असला तरी महा विकास आघाडीतील घटक पक्षांचे धाबे या निकालाने दणाणल्याचे पहायला मिळत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यपालांच्या माध्यमातून महा विकास आघाडी सरकारवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. फडणवीस अतिशय महत्त्वाकांक्षी नेते आहेत. त्यांनी सरकारच्या विरोधात सुरू केलेली मोहीम आता ते अधिक तीव्र करून सरकार कसे अडचणीत येईल आणि लवकरात लवकर सत्तापालट होईल, यासाठी प्रयत्नशील राहणार असे चित्र दिसत आहे. सरकारवर एक प्रकारचा दबाव निर्माण झाला आहे.
चार राज्यात भाजपला बहुमत मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रात 2024ला सत्ता बदल अटळ आहे, असे सुतोवाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले आहे. महाराष्ट्रात 2024ला सत्ता बदल अटळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या मुंबई मनपाला येत्या निवडणुकीत बाहेर काढू, असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. राज्यातील सध्याचे राजकिय वातावरण आणि भाजप कडुन महाराष्ट्राला करण्यात येत असलेले टार्गेट यात भाजप यशस्वी होणार की, महाविकास आघाडी त्यांची घौडदौड रोकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.