मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये 20 जिलेटीन कांड्या, एक धमकीचे पत्र तसेच चार नंबरप्लेट मिळून आल्यानंतर यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या बरोबरच मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या पथकाकडून या संदर्भात तपास केला जात असताना त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांनी हस्तगत करून त्या दिशेने तपास सुरू केलेला आहे.
गाडीत सापडल्या 4 नंबर प्लेट
मुंबई पोलिसांच्या गावदेवी पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये मिळालेल्या 4 नंबरप्लेट मधील एक , ही मुकेश अंबानी यांच्या ताफ्यातील एका गाडीशी मेळ खात असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. या गाडीतून मिळालेल्या पत्रातील मजकूर नेमका काय आहे, याबद्दल कुठलाही खुलासा पोलिसांनी केलेला नाही. मात्र, यासंदर्भात लवकरच आरोपीची धरपकड केली जाईल, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी बनावट नंबर प्लेट -
या स्कॉर्पिओ गाडीचा बनावट नंबर हा ठाणे परिसरातील असल्याचे निदर्शनास आले आहे. या वाहनाचा नंबर ठाण्यातील दाखवण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे पोलिसांच्या नजरेतून सुटून ही गाडी मुंबईत दाखल व्हावी, यासाठी या बनावट नंबर प्लेटचा वापर करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
हेही आहे - लग्न समारंभ व्यावसायिकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ, राज्यात १७ जणांची आत्महत्या