ठाणे - कल्याण डोंबिवलीत ४० शाळांचा १०० टक्के निकाल लागला असून ५ हजार ५७० विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. कल्याण डोंबिवलीत एकूण २२ हजार ८०६ विद्यार्थी शालांत परीक्षेला बसले होते, त्यापैकी १९ हजार ७९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सिस्टर निवेदिता, पाटकर मराठी, स्वामी विवेकानंद, विद्यानिकेतन, वाणी, बालक मंदिर, गजानन महाविद्यालय या प्रमुख शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. सिस्टर निवेदीत शाळेतील ७४ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, ४३ जण प्रथम व १९ विद्यार्थ्यांना दुसरा क्लास मिळाला असल्याचे प्राचार्य हर्ष बेललारे यांनी सांगितले. तसेच शिवाई बालक मंदिर ९६.२० ग्रीन ९६.६६, ओंकार ९७.६५ अशा काहीच शाळांचे निकाल चांगले लागले आहेत.
यंदा सर्वच शाळांची टक्केवारी कमी झाल्याचे दिसून आले आहे, माध्यमिक शालांत परीक्षेत केरळीयन समाज संस्थेच्या मॉडेल इंग्लिश स्कूलचा निकाल ९९ टक्के लागला आहे. स्कूलच्या वतीने शालांत परीक्षेत एकूण ४०६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यातील ४०५ विद्यार्थी पास झाले, मात्र एक विद्यार्थी परीक्षेत बसून न शकल्याने शाळेचा निकाल ९९.७५ टक्के लागला. गेल्या वर्षी या शाळेचा निकाल १०० टक्के लागला होता. कुमारी सानिया पुरुषोत्तम ९५ टक्के, सानिया जॉन साळवे ९४.२० टक्के, सर्वेश देशपांडे ९४.२० असे गुण विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहेत, १९८ विद्यार्थ्यांनी उच्च श्रेणी, १६१ प्रथम श्रेणी, तर ४६ विद्यार्थ्यांना दुतीय श्रेणी मिळाली आहे.