मुंबई - कोरोना विषाणूची लागण डॉक्टर, नर्स, पालिका कर्मचारी, पोलीस, पत्रकारांना झाली आहे. त्याच प्रमाणे मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अग्निशमन दलातील 41 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्य अग्निशमन दल अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली.
मुंबईत कोणतिही आपत्ती आली की मुंबई अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. आग, इमारत कोसळणे, घर पडणे, दरड कोसळणे, प्राणी पक्षांची सुटका आदी कामांसाठी अग्निशमन दलाला बोलावले जाते. त्यात आता कोरोनाची भर पडली आहे. कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आलेल्या विभागात विशेष करून झोपडपट्टी आणि चाळींमध्ये, रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात अग्निशमन दलाकडून निर्जंतुकीरण फवारणी केली जाते.
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या विभागात रुग्णालयात निर्जंतुकीरण फवारणी करताना मुंबई अग्निशमन दलाच्या 41 अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 22 कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी 4 आयसीयूमध्ये आहेत. तर 14 कर्मचारी अधिकारी होम क्वारंटाइन आहेत. आतापर्यंत 3 कर्मचारी कोरोनामुक्त झाल्याची माहिती प्रभात रहांगदळे यांनी दिली.