मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Param Bir Singh ) यांची सात तास चौकशी करण्यात आली. सकाळी 11 वाजल्यापासून कांदिवली क्राइम ब्रांच unit-11 कार्यालयात त्यांची चौकशी सुरू होती. डीसीपी दर्जाचे अधिकारी ही चौकशी करत होते. 230 दिवस बेपत्ता असलेले परमबीर सिंग हे पोलिसांसमोर सकाळी हजर झाले. गोरेगाव खंडणी प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली. उद्या पुन्हा त्यांची चौकशी होऊ शकते.
सुट्टीवरून आल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृह विभागाला कळवायला हवे. मात्र, अजूनही त्यांनी आपण आलो रजेवरून आहोत, असे कळवले नाही. त्यांच्यावर काय कारवाई करायचे हे सरकार ठरवेल. त्यांनी केलेले आरोप आणि त्यांच्यावर झालेले आरोप याची चौकशी सुरुच आहे, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांची माहिती आहे.
परमबीर सिंह यांच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल
परमबीर सिंह यांच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ठाणे, मुंबईमध्ये खंडणी, धमकी यांसारखे अनेक गुन्हे परमबीर सिंग यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांवर लावण्यात आलेले आहे. परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयाच्या (Parab Bir Singh in Supreme Court ) निकालानंतर कुठे उपस्थित होतात? हे पाहावे लागणार आहे. ते मुंबईत चांदिवाल आयोगासमोर हजर होतात की, सर्वोच्च न्यायालयासमोर, पहावे लागणार आहे.
नेमके प्रकरण काय?
परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे गंभीर आरोप करत मोठी खळबळ उडवून दिली होती. परमबीर सिंग हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत. तर, दुसरीकडे श्यामसुंदर अग्रवाल यांनी सिंग यांच्यावर खंडणीचे गंभीर आरोप करत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या आरोपांप्रकरणी आतापर्यंत 4 पोलीस अधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे.
हेही वाचा - Nawab Malik : वानखेडे कुटुंबीयांबाबत वक्तव्य करणार नाही; नवाब मलिकांचे न्यायालयात हमीपत्र
मुंबई पोलीस परमबीर सिंग यांचा शोध घेत आहेत. ते चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. त्यामुळे, सिंग यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, त्या आधीच न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले. त्यांच्यासह रियाज भाटी आणि विनय सिंग यांना देखील फरार घोषित करण्यात आले. तसेच, या प्रकरणी पोलीस निरीक्षक आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांना अटक करण्यात आली आहे.
परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण
फौजदारी गुन्हे दाखल असल्याने अटकेच्या भीतीने गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अटकेपासून संरक्षण दिले. तसेच, त्यांच्या याचिकेवर बाजू मांडण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकार, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांना दिले. परमबीर सिंग देशातच आहेत, ते फरार होऊ इच्छित नाहीत, आणि कुठे पळूनही जाऊ इच्छित नाहीत. परंतु, त्यांच्या जिवाला सध्या धोका आहे, असे त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
दुसरीकडे आज चांदिवाल आयोगापुढे सचिन वाझे यांची हजरी झाली. त्यावेळी परमबीर सिंग यांना आयोगाने तंबीच दिली. आयोगासमोर हजर व्हा नाहीतर कारवाईस तयार राहा असा सज्जड दमच आयोगाने दिला. ते आयोगासमोर हजर झाले नाहीत तर त्यांच्याविरोधातील वॉरंटची अंमलबजावणी करण्याचा अदेश द्यावा लागेल असे आयोगाने स्पष्ट केले आहे.