मुंबई - विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू होती. ही इनकमिंग आजतागायत सुरूच आहे. भायखळा मतदार संघामधील काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर व मुंबादेवी मतदार संघातील माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ऐन निवडणुकीत हा प्रवेश होणार असल्याने त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भायखळा येथून मनोज जामसुतकर काँग्रेसकडून निवडून आले होते. पुढे हा मतदारसंघ महिला आरक्षित झाल्याने जामसुतकर यांनी त्यांच्या पत्नी सोनम जामसुतकर यांना वॉर्ड क्रमांक २१० मधून नगरसेविका म्हणून निवडून आणले. त्यांनी शिवसेनेच्या सध्याच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा पराभव केला होता. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून मनोज जामसुतकर प्रयत्नात होते. मात्र त्यांना डावलून माजी आमदार मधू चव्हाण यांना पुन्हा काँग्रेसकडून संधी देण्यात आली. यामुळे जामसुतकर नाराज होते.
हेही वाचा- बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन केंद्रात मंत्री झालेले नेते भिकारी - आनंदराज आंबेडकर
नाराज असलेल्या जामसुतकर यांनी काँग्रेसला राम राम करत शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. जामसुतकर यांना मानणारा मतदार मोठ्या संख्येने भायखळा मतदारसंघात आहे. जामसुतकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास ही मते शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांना मिळणार आहेत. यामुळे यामिनी जाधव यांना विजय मिळवणे सहज शक्य होणार आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कोमल जामसुतकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचे नगरसेवकपद जाऊ शकते. यामुळे २०२२ च्या महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत त्या काँग्रेसमध्येच राहतील.
हेही वाचा- पाळीव मांजरीची छळ करून हत्या; न्यायालयाने ठोठावला 'इतका' दंड
सूर्यकांत पाटीलही प्रवेश करणार -
भेंडी बाजार येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील यांना मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात मानतात. पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मुंबादेवी मतदार संघातील मते शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांना मिळतील. यासाठी पाटील यांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार आहे.