मुंबई- शहरातील लोकल सेवा सर्वांसाठी सुरू केली जावी यासाठी आम्ही त्यासाठीचे निकष आणि नियमांसाठीचे एक पत्र केंद्राला पाठवले होते. त्याचे प्रत्युत्तर आम्हाला आले असून त्यासाठी आम्ही राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, अशी माहिती राज्याचे मत्स व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.
मुंबईत सर्वांसाठी लोकल चालवल्या जाव्यात अशी आमची भूमिका आहे. आम्ही यासाठीच केंद्राला महिलांसांठी लोकल सुरू करण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्यानंतर सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचेही पत्र दिले. त्यात निकष ठरवले होते आणि त्यानंतर आम्ही मुंबईत लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणीही केली होती. ती सुरू केली जावी, अशी आमची मागणी आहे. मात्र, त्यात वेळ लावला तर महिलांसाठी जसे राजकारण झाले, तसे राजकारण होईल, अशी शक्यता शेख यांनी व्यक्त केली.
दरम्यान, राज्यपाल नियुक्त १२ जागांसंदर्भात झालेल्या निर्णयावर शेख म्हणाले की, १२ जागांसाठी प्रस्ताव मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री राज्यपालांकडे नावे देतील. हा कायदेशीररित्या प्रस्ताव मंजूर झाल्यावर तो पुढे जाईल, असेही शेख यांनी सांगितले. तसेच, राज्यात भाजपकडून मंदिरे खुली करण्यात आली नाही, तर आम्ही टाळे तोडू असा इशारा दिला जात असून त्यावर, भाजपच्या लोकांनी पंतप्रधानांचे ऐकले पाहिजे. अजूनही कोरोनाचे संकट संपलेले नाही. म्हणून आम्हाला असे वाटते की, लोकांचा जीव वाचला पाहिजे. परंतु, कोणी मंदिर आणि ताळे तोडण्याचा विषय काढला, तर आम्ही त्याला तसेच उत्तर देऊ, असेही शेख यांनी सांगितले.
हेही वाचा- मुंबई महापालिका पैशाने श्रीमंत असली तरी सत्ताधारी वृत्तीने दरिद्रीच - अतुल भातखलकर