मुंबई : गुरुकुल प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी बासरी महोत्सव सादर केला जातो. कोरानंतर प्रथमच अत्यंत दिमाखदार पद्धतीने बासरी वादनाचा हा सोहळा पार पडणार आहे. या बासरी वादनाच्या उत्सवात गानप्रभा पंडित प्रभाताई अत्रे आणि पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची देखील उपस्थिती राहणार आहे. या दोन संगीत क्षेत्रातल्या दिग्गज कलाकारांना अभिवादन करण्यासाठी आज मुंबईत समुद्राच्या किनारी पंडित विवेक सोनार आणि त्यांचे चाळीस सहकलाकार बासरी वादन करत होते.
लाईफ टाईम पुरस्कार : गुरुकुल प्रतिष्ठानच्यावतीने भारतीय शास्त्रीय संगीतात योगदान दिल्या संदर्भात दरवर्षी लाईफ टाईम पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या नावाने दिला जातो. विविध दिग्गज कलाकारांना पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. यंदा महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रातील दिग्गज अशा गानप्रभा ज्यांना म्हटले जाते, त्या पद्मविभूषण प्रभात अत्रे यांना देखील पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
एकाच वेळेला एकाच मंचावर 90 कलाकार सहभागी : या संदर्भात विवेक सोनार यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, गुरुकुल प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी बासरी महोत्सव आयोजित केला जातो. कोरोनामुळे मध्यंतरी यामध्ये खंड पडला होता. पण आता परिस्थिती पूर्ववत झाली आहे. यंदाचा बासरी उत्सव 21 आणि 22 जानेवारी रोजी होणार आहे. त्यात एकाच वेळेला एकाच मंचावर 90 कलाकार सहभागी होतील. त्याचीही तालीम करण्यासाठी समुद्रकिनारी हे सर्व कलाकार जमले होते. यामध्ये सात वर्षाचा बालक ते 70 वर्षाचे आजोबा देखील सामील आहेत.
हरिप्रसाद चौरसिया यांच्या नावाचा पुरस्कार : पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या नावाचा हा पुरस्कार आतापर्यंत भारतातील ज्येष्ठ आणि प्रख्यात सरोद वादक उस्ताद अमजद अली खान तर प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांना प्रदान करण्यात आला. त्याशिवाय, ज्येष्ठ गायक पंडित जसराज, ज्येष्ठ गायिका पंडित किशोरीताई अमोणकर, दक्षिण भारतातील प्रसिद्ध बासरी वादक एन रमणी यांना प्रदान करण्यात आला आहे. यंदाचा पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार हा महाराष्ट्रातील प्रभाताई यात्रे यांना दिला जाणार आहे.