मीरा भाईंदर : मिरारोड रेल्वे स्थानकाच्या बाहेर मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी 'टॉप 10' मोबाईल दुकानाचे मालक अनिल छेडा व त्यांचे साथीदार कमलेश मिश्रा यांच्या विरोधात नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र नया नगर पोलीस ठाण्यात लॉकअप नसल्याने त्यांना मिरारोड पोलीस ठाण्यात आणले असता तेथे लॉकअप मध्ये न ठेवता त्यांना मिरारोड पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर अधिकारी कक्षात बसवण्यात आले होते.
पाच अधिकाऱ्यांचे निलंबन : या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चौकशी केल्यानंतर मीरारोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मिलिंद बोरसे व लॉकअप गार्ड असलेले नया नगर पोलीस ठाण्याचे पोलीस रामेश्वर तारडे, बाबुराव गरुड, विजेंद्र दिवेकर, कैलास ठोसर ह्या पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे. अशाप्रकारे या पोलिसांना व्हीआयपी सर्व्हिस चांगलीच भोवली आहे.
काय आहे प्रकरण? : 12 फेब्रुवारी रोजी मीरारोड रेल्वे स्थानकाजवळ एमबीएमटीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती. मीरा रोड पूर्वेला रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या चौकात मीरा - भाईंदर महापालिका, मुंबई बेस्ट, ठाणे पालिका यांचे बसस्थानक आहे. या चौकात बस वळवून तेथील बसस्थानकावरून प्रवासी वाहतूक केली जाते. याच चौकात 'टॉप - 10 मोबाइल' नावाचे दुकान आहे. दुकानाचे मालक अनिल छेडा यांनी त्यांची चारचाकी चौकात उभी केली होती. या मोटारीमुळे बस वळवण्यात अडचण येत होती. त्यामुळे बसचालकाने छेडा यांना गाडी पुढे घेण्यास सांगितले होते. यावरून दुकानाचे मालक व त्यांचा साथीदार ह्या दोघांनी मिळून परिवरहन कर्मचाऱ्याला मारामारी केली होते.
सीसीटीव्ही फुटेजद्वारे सत्य उघड : त्यानंतर अटक करण्यात आलेल्या या आरोपींना नयानगर पोलिसांनी मीरारोड पोलीस ठाण्याच्या लॉकअप मध्ये न ठेवता पहिल्या मजल्यावरील अधिकारी कक्षात बसवले. या प्रकरणी तक्रारी नंतर चौकशी केली असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील हे दिसून आले. या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मिलिंद बोरसे व लॉकअप गार्ड व नया नगर पोलीस ठाण्याचे पोलीस रामेश्वर तारडे, बाबुराव गरुड, विजेंद्र दिवेकर, कैलास ठोसर यांना निलंबित करण्यात आले आहे.