मुंबई - कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी दाट वस्तीच्या ट्रॉम्बे-चिता कॅम्प या परिसरात 'कम्युनिटी क्लिनिक' सुरू करण्यात आले आहेत. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, 'ट्रॉम्बे डॉक्टर्स असोसिएशन' आणि मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयातून सुरू करण्यात आलेल्या एकूण 5 कम्युनिटी क्लिनिकच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांची कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे.
![five community clinic started in trombay](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5_20042020143155_2004f_1587373315_279.jpg)
अभिनव शाळा, चेरेश्वर ग्राउंड, आयडियल शाळा, चिता कॅम्प म्युनिसिपल शाळा, आझाद शाळा या 5 ठिकाणी 20 एप्रिलपासून कम्युनिटी क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. याठिकाणी कार्यरत असलेले खासगी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यातून नागरिकांची प्राथमिक तपासणी (शरीराचे तापमान, इतर लक्षणे) केली जाणार आहे. कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
लक्षणे आढळणाऱ्या आणि कोरोनाबधितांना आवश्यकतेनुसार क्वारंटाईन केले जाणार आहे. कम्युनिटी क्लिनिकच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज झालेल्या खासगी डॉक्टरांचे, खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी आभार मानले आणि या डॉक्टरांना पीपीई कीटचे वितरण केले.