मुंबई - निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा कोकणातील जिल्ह्यांना बसला आहे. ३ जूनला आलेल्या वादळात कोकणचे खूप मोठे नुकसान झाले आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीसंदर्भात राज्य सरकारने मदतीचे एक परिपत्रक जाहीर केले आहे. मात्र, यामध्ये मच्छिमारांच्या नुकसानीचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे मच्छिमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना राज्य आपत्ती व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्र शासनाने विहित केलेल्या दरानुसार मदत देण्यासाठी महसूल व वन विभागाने १० जूनला परिपत्रक प्रसिध्द केलेले आहे. त्यात १ ते ७ मुद्यांत फक्त घरांचे झालेल्या नुकसानीचा, झोपड्यांचा, दुकानदार, टपरी व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याचे जाहीर केले आहे. या परिपत्रकात मच्छिमारांच्या नौकांचे, इंजिनचे, जाळ्यांचे, मासेमारी साहित्य व मोठ्या प्रमाणात सुक्या मासळीचे नुकसान झाले आहे. मात्र, त्याचा अजिबात समावेश करण्यात न आल्यामुळे मच्छिमार समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे मासेमारी व्यवसाय उधवस्त झाला आहे. मच्छिमार समाज उपासमारीला तोंड देत आहे. मागील ५० कोटी व चक्रीवादळाची २५ कोटींची भरपाई राज्य शासनाने त्वरित मंजूर करावी. मच्छिमारांसाठी नव्याने वेगळे परिपत्रक महसूल व वन विभागाने मंजूर करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे मच्छिमार समाज उपासमारीला तोंड देत आहे. मत्स्यशेती करणाऱ्या मच्छिमारांना उपेक्षित का ठेवले? असा सवाल दामोदर तांडेल यांनी शासनाला विचारला आहे. महसूल व वन विभागाने १० जूनच्या परिपत्रकात मच्छिमारांना आर्थिक मदत देण्याचा उल्लेख का नाही असा सवालही तांडेल यांनी केला. रायगडचे जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या निर्दशनास ही गोष्ट आणल्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी आजच चर्चा करून या चक्रीवादळात मच्छिमारांच्या झालेल्या नुकसानीचे वेगळे परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले आहे.