मुंबई : घाटकोपर पूर्व येथे एका उमंगा इमारतीला मंगळवारी आग लागली होती. या आगीमुळे घाबरलेली एक महिला सज्जावर उतरली होती. सज्जावर उतरल्यानंतर तिला पुन्हा वरती खिडकीतून आत जाता येत नव्हते. सज्जावर अडकलेल्या या महिलेची मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी या महिलेची सुखरूप सुटका केली आहे. त्यांच्या या कामामुळे घाटकोपर परिसरातून त्यांचे कौतूक होत आहे.
सर्व सामान जळून खाक : घाटकोपर पूर्वमधील पंतनगर पोलीस ठाण्यासमोर उमंगा ही 15 मजली इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर 404 नंबरच्या घराला सकाळी सव्वा सातच्या सुमारास आग लागली होती. या आगीमध्ये घरातील इलेक्ट्रिक वायरिंग वस्तू एअर कंडिशन, टीव्ही, लाकडी फर्निचर, सोफा आदी सर्व जळून खाक झाल्या होत्या. घरामध्ये आग लागल्यामुळे या घरात राहणाऱ्या किरण आर वय 30 वर्षे ही महिला आपला जीव वाचवण्यासाठी खिडकीतून सज्जावर उतरली होती.
सज्जावरून महिलेची सुखरूप सुटका : आगीच्या भीतीने सज्जावर उतरलेली ही महिला पुन्हा खिडकीने घरात जाऊ शकली नाही. ती काही वेळ सज्जावरच अडकली होती. या महिलेच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाचे जवान घराच्या खिडकीतून तिला घरात घेण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याचवेळी अग्निशमन दलाने शिडी लावून आपला एक जवान महिला अडकलेल्या सज्जापर्यंत पाठवला. शिडीद्वारे जवानवर पोहचे पर्यंत घरात आग विजवणाऱ्या जवानांनी या महिलेला खिडकीतून आत घेवून तिची सुखरूप सुटका केली.
कांदिवलीत मानसिक रुग्णाची सुटका : कांदिवली पूर्व येथील सरोवर साहेब टॉवरमध्ये २२ व्या माळ्यावर असलेल्या सज्जावर एक मानसिक आजार असलेला रुग्ण उतरला होता. सज्जावर उतरल्यानंतर हा रुग्ण बेशुद्ध पडला. येथील रहिवाशांनी पोलीस तसेच मुंबई अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सदर व्यक्ती हा बेशुद्ध झाल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी रश्शीच्या साहाय्याने आपला एक कर्मचारी सज्जावर उतरवला, त्यानंतर त्या रुग्णाची सुखरूप सुटका करण्यात आली होती.
हेही वाचा : Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दैना; ६ हजारपेक्षा जास्त हेक्टरवरील शेतीचे नुकसान