मुंबई : कुर्ला पश्चिम येथे कोहिनूर सिटी, प्रीमियर कंपाऊंड, एचडीआयएल कॉम्प्लेक्सजवळ इमारत क्रमांक ७ सी आहे. तळ अधिक १२ मजली ही इमारत आहे. या इमारतीमध्ये सकाळी ७ च्या सुमारास ४ ते १० माळ्यापर्यंत आग पसरली होती. आग लागल्याने संपूर्ण इमारतीमध्ये धूर पसरला होता. आग लागल्याने तसेच इमारतीमध्ये धूर पसरल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. घटनेवेळी इमारतीत अनेक जण अडकले होते.
एका महिलेचा मृत्यू : इमारतीला आग लागल्याने रहिवाशांनी आगीची माहिती पोलीस कंट्रोल रूमला दिली. पोलीस कंट्रोल रुमने या आगीची माहिती मुंबई अग्निशमन दल तसेच पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दिली. घटनास्थळी ४ फायर इंजिन आणि ३ जंबो वॉटर टँकर दाखल झाले होते. इमारतीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना टेरेसवरून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेत एक महिला जखमी झाली. त्या महिलेला राजावाडी रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले असता, तीचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली. शकुंतला रामाणी वय ७० वर्षे असे या मृत महिलेचे नाव असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
आगीत मुलाचा मृत्यू : १३ फेब्रुवारी रोजी जम्रिशी नगर, वागेश्र्वरी मंदिर, कुरार विलेज, मालाड पूर्व येथील १०० झोपड्यांना आग लागली होती. यावेळी १० ते १५ सिलेंडरचा स्फोट झाला. यात एका १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. प्रेम तुकाराम बोरे असे या मृत मुलाचे नाव आहे. या आगीत तब्बल १०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.
६ वर्षातील मृत्यू : आग व इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडणे अशा २०१३ पासून २०१८ या ५ वर्षांच्या कालावधी ४९ हजार १७९ दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. घटनेत ९८७ जणांचा मृत्यू झाला आहे. ३०६६ जण जखमी झाले होते. १ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यंत एकूण १३,१५० दुर्घटना घडल्या. यांत १७९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १३२ पुरुष आणि ४७ स्त्रियांचा समावेश आहे. तर ७२२ जण जखमी झाले. २०१३ ते २०१९ या ६ वर्षाच्या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये ११६६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : Air India Boeing Deal : एअर इंडिया-बोईंगच्या करारामुळे भारत व अमेरिकेतील व्यावसायिक भागीदारी मजबूत होईल