मुंबई - चेंबूर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या शुभम फ्लोरा अपार्टमेंटमधील तिसऱया माळ्यावरील दाताच्या दवाखान्यातील एसी मशीनमध्ये शाॅर्टसर्कीट झाल्यामुळे आग लागली. दुपारी 2 च्या सुमारास ही आग लागली होती. आगीत या दवाखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. आगीत कोणीही जखमी झाले नसून अग्निशामक दलाच्या पाच टँकरने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
मुंबईत आगीचे सत्र चालूच आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी मुंबईतील नागरिक एसीचा वापर करतात. काही दिवसांपूर्वी घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरातील मोबाईल दुकानातील एसीमध्ये आग लागून दुकानाचे मोठे नुकसान झाले होते. एसीत सातत्याने आगी लागण्याचे प्रमाण वाढत असल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडत आहे.
चेंबूर नाका मोनो स्थानकाजवळील शुभम फ्लोरामध्ये व्यावसायिक गाळे आहेत. आज दुपारी दोनच्या दरम्यान तिसऱया माळ्यावरील दातांच्या दवाखान्यात एसी मशीनमध्ये शाॅर्टसर्कीट झाल्यामुळे आग लागली होती. आगीचे प्रमाण वाढत असल्याने जवळील चेंबूर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दवाखाना आणि परिसरात जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला होता. इतर माळ्यावरील नागरिक आणि रुग्ण लवकर खाली उतरले असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
डॉक्टर निलेश जाधव, दातांचा दवाखाना -
या इमारतीत बरेच गाळे आहेत. डॉक्टर आणि रुग्णांची संख्या रोज मोठ्या प्रमाणात असते. माझा पहिल्या आणि तिसऱया मजल्यावर दवाखाना आहे. मला दवाखान्यातील महिला कर्मचारी यांनी माहिती दिली की, दवाखान्यात तिसऱ्या माळ्यावर आग लागली आहे. तेंव्हा मी दवाखान्यात पोहोचलो तर पोलीस कोणालाही आत सोडत नव्हते. त्याचवेळी आगीचे प्रमाण वाढले होते तेव्हा सर्व डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्ण दवाखान्याच्या खाली उतरले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पी. जी. दुधाळ, अग्निशामक अधिकारी चेंबूर -
आम्हाला दोन वाजता मेसेज आला की, चेंबूर नाका परिसरातील दवाखान्याला आग लागली आहे. आम्ही तात्काळ अग्निशामक वाहन पाठवून परिस्थिती पाहून इतर ठिकाणाहून काही पाण्याचे टँकर मागवून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. यात कोणीही जखमी झाले नाही. दवाखान्यातील साहित्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, इलेक्टरीक वायरिंग पूर्णपणे जळून खाक झाली आहे. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.