मुंबई - पवई पोलिसांनी २ येमेन नागरिकत्व असलेल्या आरोपींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या दोन फरार परदेशी नागरिकांनी येमेन देशाच्या ६ सैनिकांची आर्थिक फसवणूक केली आहे.
येमेन देशात सुरु असलेल्या गृह युद्धात जखमी झालेल्या ६ येमेनी सैनिकांवर मुंबईतील मुंलुंड परिसरातील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, या दरम्यान ६ सैनिकांच्या संपर्कांत फाहद रदवाण अल मस्तरी व अली अब्दुघनी अली अल गौजी हे येमेनी नागरिक आले होते. या दरम्यान या दोन येमेनी आरोपींनी त्यांची येमेन दूतावासात चांगली ओळख असून या जखमी सैनिकांना चांगल्या रुग्णालयात उपचार मिळवून देऊ शकतो, असे सांगितले होते.
सैनिकांचा आरोपींवर विश्वास बसावा म्हणून या दोन्ही आरोपींनी उपचार घेत असलेल्या सैनिकांना त्यांचे पासपोर्ट दाखविले होते. नवी मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात सर्वसोयी असून या ठिकाणी या ६ सैनिकांना नेण्यासाठी २ लाख रुपये आरोपींनी घेतले होते. मात्र, पैसे देऊनही या आरोपींशी संपर्क होत नसल्याने ६ सैनिकांनी येमेन दूतावासात चौकशी केली असता, त्यांना आपली फसवणूक झाल्याचे कळाले. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात कलम ४२० व ४०६ नुकसार गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार येमेनी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.