मुंबई - 'गेल्या आठवडाभरापासून राज्यात अतिवृष्टीमुळे भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, राज्यात आपदा घोषित करायला सरकार तयार नाही. अनेक लोक मृत्युमुखी पडत आहे. या विरोधात वेळ पडल्यास 302 अंतर्गत गुन्हा दाखल करायला मागे पाहणार नाही.' असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
यासंदर्भात नाना पटोलेंनी आज काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळासह राज्याच्या मुख्य सचिवांची मंत्रालयात भेट घेतली. पटोले यांनी मुख्य सचिवांना लिखित सूचनादेखील दिली आहे. 'राज्यात अतिवृष्टीमुळे भयंकर पूरस्थिती आहे. अशा बिकट प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले देवेंद्र फडणवीस हे प्रचार यात्रा काढण्यात व्यस्त आहेत. जनतेच्या पैशांवर ते पंचतारांकित जनादेश यात्रा करत आहेत. असा घणाघाती आरोप पटोलेंनी केला आहे. यावेळी पटोलेंसोबत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते.
३७० कलमावर बोलण्यास मात्र नाना पटोलेंनी नकार दिला. ते म्हणाले, 'आज काही राजकीय पक्ष पेढे वाटत आहेत. संकटातील राज्यातील जनतेची त्यांना काळजी नाही. मुख्यमंत्री म्हणतात मोबाईलवरून संपर्कात आहे. सरकार मोबाईलवर चालते का,' असा सवालही पटोलेंनी उपस्थित केला.