मुंबई - इंटरनॅशनल डॉटर्स डेच्या निमित्ताने दिवंगत अभिनेता इरफान खानची पत्नी सुतापा सिकदरने इरफानबाबतची एक आठवण सांगितली आहे. त्यांचे दुसरे मुल जन्माला येत असताना कशाप्रकारे दोघेही 'मुलगीच होऊ दे' ही आस लावून होते, आणि डॉक्टरकडून मुलगा झाल्याचे कळताच दोघेही कसे शांत झाले, याबाबत तिने फेसबुकवर लिहिले आहे.
सुतापा म्हणाली "मला आणि इरफानला एक मुलगी असावी, अशी तीव्र इच्छा होती. मात्र, माझ्या दुसऱ्या प्रसूतीनंतर डॉक्टरांनी 'अभिनंदन ! मुलगा झाला आहे,' असे सांगितले. तेव्हा, आम्ही दोघेही जरा शांत झालो. कारण दोघांनीही मुलगी व्हावी, यासाठी खूप प्रार्थना केली होती. एक मुलगी इरफानच्या पालकत्वापासून वंचित राहिल्याची खंत आज मला जाणवते.”अशी भावना सुतापाने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन शेअर केली आहे.
काही दिवसांपूर्वी सुतापाने एका मुलाखतीदरम्यान इरफानबाबत काही आठवणी ताज्या केल्या होत्या. इरफान रोमँटिक नव्हता; मात्र, तिला स्पेशल वाटावे, असे काहीतरी नेहमी खास करण्याचा त्याचा प्रयत्न असायचा, असे तिने सांगितले होते. 'इरफान मॅरिज मटेरिअल नव्हताच, त्याला त्याचा वाढदिवसही लक्षात राहत नसे, त्यामुळे त्याच्यातील चुका काढणेही कधी-कधी कठीण जात होते, असेही सुतापानी सांगितले होते.
दीर्घ आजाराशी झुंज देत असलेल्या हरहुन्नरी अभिनेता इरफान खानने २९ एप्रिल रोजी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पश्चात पत्नी सुतापा आणि दोन मुले - बाबील आणि अयान आहेत.