मुंबई - पुरोगामी कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या 20 ऑगस्टला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या हत्येच्या सूत्रधाराचा अद्याप तपास लागला नाही. कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम.एम. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्या झाल्या. हिंसेच्या घटनेत दिवसेंदिवस वाढच होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून 'हिंसा के खिलाफ, मानवता की ओर' हा संदेश देत निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते.
आज (रविवारी) सकाळी 7 वाजता दहिसर पूर्व रेल्वे स्थानकापासून ही निर्भय रॅली सुरू झाली व जरीमरी गार्डन येथे रॅलीची सांगता झाली. मुंबई जिल्ह्यातील व आसपासच्या परिसरातील सर्व कार्यकर्ते व मानवतावादी नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
महाराष्ट्र अंनिसकडून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार कोण? असा सवाल विचारणारे निवेदन माननीय मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना देणार असल्याचे महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशीलकर यांनी यावेळी सांगितले. तसेच 20 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस' म्हणून सर्वत्र साजरा केला जात असल्याचे ही त्यांनी नमूद केले.
राज्यभरात घडणाऱ्या हिंसक घटनांचा महाराष्ट्र अंनिसतर्फे नेहमीच आम्ही निषेध करत आलो आहोत. यापुढेही आम्ही हिंसाविरोधी व मानवतेचा पुरस्कार करणारा लढा चालू ठेवू, असा निर्धार यावेळी महाराष्ट्र अंनिसच्या दहिसर शाखेचे प्रधान सचिव निशा यांनी तरुणांच्या वतीने व्यक्त केला.