मुंबई: सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी होळकर यांची निशाण असलेली पताका आणि त्यांचे छायाचित्र घेऊन विधिमंडळात प्रवेश केला. ज्यांनी मोगलशाही विरोधात, इंग्रजांविरोधात लढाया केल्या आहेत त्या हिंदवी स्वराज्यासाठी ज्याने स्वतःचे रक्त सांडले अशी ही होळकरांची पताका खांद्यावर घेऊन मी आज आलो आहे असे ते म्हणाले. या महाराष्ट्रात काका-पुतण्या धार्जिण्या लोकांचे राजकारण सुरु आहे. गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून हे सुरू आहे. सुभेदार मल्हारराव होळकरांनी मोगल शाहीला टाचेखाली चिरडले, यशवंतराव होळकरांनी इंग्रजांना टाचेखाली चिरडले आणि या महाराष्ट्रातला बहुसंख्य समाज, जो धनगर, ओबीसी, भटका विमुक्त आहे. गावा गावात राहतो तो समाज आज मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त या धार्जिण्या लोकांना टाचेखाली चिरडण्याची शपथ घेत आहे असेही पडळकर म्हणाले.
पानिपतच्या पराभवानंतर ज्यांनी स्वराज्याचा भगवा पताका खांद्यावर घेऊन तो पेलला. पानिपतच्या पराभवाचे रुपांतर प्रभावा मध्ये ज्यांनी केले. हिंदवी स्वराज्याची पताका अटक पासून कटक पर्यंत ज्यांनी पसरवली, असे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रातील सर्व बहुजनांना गोपीचंद पडळकर यांनी आज शुभेच्छा दिल्या. होळकर शाहीचा इतिहास प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या लेखकांनी पुसायचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केला. होळकरांचा खरा इतिहास बहुजनंना समजला तर ते त्यांचा राजकीय हक्क मागतील. त्यांची राजकीय शक्ती वापरतील. या राज्यातील धनगर, ओबीसी, भटके-विमुक्त, बहुजन समाज शासन कर्ता बनेल अशी भीती काका- पुतण्या लोकांना आहे, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट नाव न घेता निशाणा साधला आहे.