मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षारक्षकांना कोरोनाची बाधा होत आहे. अनेकजण त्यावर उपचार घेत आहेत. त्यामुळे सुरक्षारक्षकांची संख्या कमी असताना मुंबई महापालिका मुख्यालयातील सुरक्षारक्षकांना कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणाऱ्या चंदनवाडी स्मशानभूमीत ड्युटीवर पाठवले जात आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईमधील कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजारावर, तर मृतांचा आकडा हजारावर गेला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर पालिका तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिका रुग्ण आणि नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत असताना कर्मचारी कोरोनाने आजरी पडत असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढू लागली आहे.
मुंबई महापालिकेचे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे मुख्यालय आहे. या मुख्यालयात 3500 कर्मचारी अधिकारी काम करतात. याच ठिकाणी महापौर, विविध समित्यांचे अध्यक्ष, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांची कार्यालये आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांची नेहमी गर्दी होत असते. तसेच अनेक लोकप्रतिनिधी मुख्यालयात येत असल्याने प्रत्येक गेटवर सहा ते आठ सुरक्षारक्षक तैनात केले जाते. पालिका मुख्यालयात सुमारे 100 शस्त्रधारी तसेच बिगर शस्रधारी सुरक्षा रक्षक तैनात केले जातात.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर पालिका मुख्यालयातील सुरक्षारक्षकांना कस्तुरबा रुग्णालयात सुरक्षेसाठी पाठवण्यात येत होते. आता या सुरक्षारक्षकांना चंदनवाडी स्मशानभूमीत सुरक्षेसाठी पाठवले जात आहे. पालिकेचे सुमारे 60 सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी जवळपास 15 ते 17 सुरक्षा रक्षक पालिका मुख्यालयातील आहेत. यामुळे सुरक्षारक्षकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यातच आता कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असलेल्या चंदनवाडी स्मशानभूमीत सुरक्षेसाठी पाठवले जात आहे. त्यामुळे आपल्यालाही कोरोनाची लागण होईल याची भीती सुरक्षारक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
पालिका मुख्यालयाची सुरक्षा धोक्यात -
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती सक्तीची करण्यात आली आहे. यामुळे सुरक्षा रक्षकांना पालिका मुख्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची थर्मल स्कॅनिंग करावी लागत आहे. इतर ठिकाणी सुरक्षा रक्षक पाठवले जात असल्याने सुरक्षा रक्षकांची संख्या कमी आहे. सध्या मुख्यालयात सुरक्षारक्षकांची संख्या कमी असल्याने पालिका मुख्यालयाची सुरक्षा धोक्यात आली आहे.