मुंबई: मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे हे रोज सकाळी मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी जात असतात. नेहमीच्या सवयीप्रमाणे संदीप देशपांडे हे आज देखील मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कवर गेले असता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सध्या संदीप देशपांडे यांची तब्येत गंभीर असून त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. या हल्ला प्रकरण यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकच आक्रमक झाली आहे.
अमित ठाकरेंनी स्वतः गाडी चालवली: संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे या दोघांनी थेट हिंदुजा रुग्णालय गाठले. त्यांनी संदीप देशपांडे यांच्या तब्येतीची चौकशी केली. अशी माहिती मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिल्याचे देखील मनसेच्या विश्वसनीय पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे अमित ठाकरे स्वतः गाडी चालवून रुग्णालयात दाखल झाले.
प्रमुख नेते रुग्णालयात उपस्थित: सध्या हॉस्पिटल परिसरात संदीप देशपांडे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते नितीन सरदेसाई, संतोष धुरी व अन्य पदाधिकारी हिंदुजा रुग्णालयात उपस्थित आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकच आक्रमक झाली असून, या हल्ल्यामाग नेमके कोण आहे? याचा अधिक तपास करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणावर मनसे प्रवक्ते संदिप देशपांडे याच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध, अशी महाराष्ट्राची संस्कृती नाही. ह्या हल्ल्यामागचा सूत्रधार कोण हे मात्र जनतेच्या पुढे आले पाहिजे. बाकी जसाच तसे उत्तर देऊच.अशी प्रतिक्रिया मनसेचे पदाधिकारी मनोज चव्हाण यांनी दिली आहे.
हे खपवून घेणार नाही: मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे या आमच्या सहकाऱ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. संदीप या हल्ल्यातून सावरेल याची पूर्ण काळजी आम्ही घेत आहोत. पण हे घाणेरडे राजकारण आता थांबले पाहिजे. सुपाऱ्या देऊन प्राणघातक हल्ले करण्याचे हे गुंडगिरीचे राजकारण आम्ही कधीही खपवून घेणार नाही.अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली आहे.