मुंबई - म्हाडा लॉटरीतील पात्र विजेत्यांना अखेर म्हाडाने कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा दिला आहे. कोरोना-लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेता म्हाडाने पात्र विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी आता 15 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. महत्वाचे म्हणजे ही मुदतवाढ बिनव्याजी असून, मुंबई आणि कोकण मंडळातील पात्र विजेत्यांसाठी ही मुदतवाढ लागू आहे. तर गिरणी कामगारांनाही याचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.
म्हाडा लॉटरीत विजेते ठरलेल्यांना देकार पत्र मिळाल्यानंतर निर्धारित वेळेत घराची रक्कम भरावी लागते. अन्यथा त्यावर व्याज आकारले जाते. तर नियमानुसार ठराविक मुदतीत रक्कम न भरल्यास घरास मुकावे लागते. त्यामुळे ही रक्कम वेळेत भरणे गरजेचे असते. मात्र, मार्चपासून कोरोना-लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार बंद आहेत. त्यात काही जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पगार कपात झाली आहे. उद्योग धंदे बंद आहेत. एकूणच आज सर्वच जण आर्थिक अडचणी अडकले आहेत. त्यामुळे कित्येक पात्र विजेतेही घराची रक्कम भरू शकलेले नाहीत.
ही परिस्थिती लक्षात घेता म्हाडाने मुंबई-कोकण मंडळातील विजेत्यांना ही रक्कम भरण्यासाठी 15 डिसेंबर 2020 पर्यंत बिनव्याजी मुदतवाढ दिली आहे.
मुंबई मंडळाच्या सर्वसाधारण लॉटरीतील विजेत्यांसह गिरणी कामगारांच्या लॉटरीतील अंदाजे 700 पात्र विजेत्यांना याचा फायदा होणार आहे. तर कोकण मंडळातील २०१४, २०१६ आणि २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या लॉटरीतील सुमारे १००० पात्र लाभार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा मिळणार आहे. कोकण मंडळाच्या लॉटरीतील पात्र लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या देकार पत्राची मुदत १५ मार्च, २०२० पर्यंतच होती. पण आता मात्र त्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे