मुंबई: मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ही दोन महत्वाची टर्मिनस आहेत. सीएसएमटी स्थानकातून लोकल आणि लांब पल्याच्या गाडयां सुटतात तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून फक्त लांब पल्याच्या गाड्या धावतात. सीएसएमटी स्थानकातून दररोज सुमारे ९० लांब पल्याच्या गाड्या चालविण्यात येतात. १०,११ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्म वरुन १३ डब्यांच्या तर १२ आणि १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरुन १७ डब्यांच्या गाड्या धावतात. तर १४ ते १८ क्रमांकावरुन २४ डब्यांच्या मेल-एक्सप्रेस धावतात. १० ते १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरुन २४ डब्यांच्या गाड्या चालविण्याचा रेल्वेला मानस आहे. त्याकरिता या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.
विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गाडीला आणखी सात डबे जोडता येतील. या चार प्लॅटफॉर्मवरुन रोज १० गाड्यांच्या फेऱ्या होऊ शकतील. एका डब्यातील आसनक्षमता ७० धरली तरी रोज ४९०० प्रवाशांना याचा थेट फायदा होईल. तसेच वेटिंग लिस्ट कमी होईल. प्रवासी वाढल्याने रेल्वेच्या महसूलात देखील वाढ होणार आहे. या चार प्लॅटफॉर्मटचा विस्तार करण्याचे काम मंजूर झाले आहे. यासाठी २०२१-२२च्या अर्थसंकल्पात ६३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. हे काम नुकतेच सुरू केले आहे. या कामाचा पहिला टप्पा मार्च २०२३ आणि दुसरा टप्पा मार्च २०२४मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा : 12 new AC local :खुशखबर पश्चिम रेल्वे मार्गावर उद्यापासून 12 नव्या एसी लोकल धावणार