मुंबई: मुंबईत ओबीसी आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाने काढलेला मोर्चाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना "घरी जा, स्वयंपाक करा" असे वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सर्वस्तरातून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली. याबाबत काही नागरिक तसेच पुणे शहर लीगल सेल चे सदस्य असलेले एडवोकेट असीम सरोदे यांनीही राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तक्रारीवरून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या आक्षेपाहार्य वक्तव्याबाबत खुलासा करावा म्हणून राज्य महिला आयोगाने पत्र पाठवलआहे.
राज्य महिला आयोग कायदा 1993, कलम 12 (2) आणि कलम 12 (3) नुसार दोन दिवसात लेखी खुलासा करावा असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नमूद केले आहे. महिला आज सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत. आपल्या स्वकर्तुत्वावर व्यवसाय, शिक्षण, समाजकारण, राजकारण अशा सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. मात्र आपण केलेले वक्तव्य हे सर्व महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारे आहे. आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारचे वक्तव्य खेदजनक असून या वक्तव्याबाबत आपण खुलासा करावा असे या पत्रात राज्य महिला आयोगाने नमूद केले आहे.