मुंबई - राज्यातील विदर्भ वगळता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 15 जून 2021 पासून सुरू करण्यात आले आहे. शाळा प्रवेशासाठी आणि शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर दहावीच्या निकालाचे कामही करत आहेत. अशावेळी शिक्षकांना उपनगरीय रेल्वे प्रवास करण्याची परवानगी नाही. त्यामुळे शालेय कामे खोळंबलेली आहेत. त्यातच आता दहावीच्या शिक्षकांना बीएलओचे (बूथ लेव्हल ऑफिसर) काम दिले आहे. त्याचा परिणाम दहावीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे. यामुळे दहावीचा निकाल तयार करणाऱ्या शिक्षकांना बीएलओचे दिलेले काम तत्काळ रद्द करण्याची मागणी, शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.
'निकालाची कामे करायची की बीएलओची?'
एकीकडे दहावीच्या निकालाची कामे सुरू आहेत. तर, दुसरीकडे शिक्षकांना बीएलओच्या कामाला जुंपण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांना या कामातून वगळण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील शाळांमधील अनेक शिक्षकांना बीएलओच्या कामाचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये शिक्षकांना मतदार यादीचा अभ्यास करणे, यादीतील दुरुस्ती करणे, दुबार, मयत, स्थलांतरीत व मतदान छायाचित्र चिटकविणे, मतदारांना आपल्या ताब्यातील नोटिसा बजावणे, इत्यादी कामे करावी लागणार आहेत.
यंदा दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे अंतर्गत गुणांवर आधारित निकालाची कामे शिक्षण मंडळाने शिक्षकांवर सोपवली आहेत. दिलेल्या मुदतीत ही सर्व कामे करायची आहेत. त्यामुळे सर्व शाळांमध्ये शिक्षकांची निकालाच्या कामाची धावपळ सुरू आहे. त्यातच बीएलओची कामे शिक्षकांच्या माथी मारल्यामुळे निकालाची कामे करायची की बीएलओची? असा संतप्त सवालही अनिल बोरनारे यांनी प्रशासनाला विचारला आहे. शिवाय, तातडीने अशैक्षणिक कामे बंद करण्याची मागणी केली आहे.
'शिक्षकांना बीएलओच्या कामातून वगळा'
'2021-22 शैक्षणिक वर्षाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी, ती वेळेत पूर्ण होण्यासाठी शाळेत शिक्षकांनी हजर राहणे आवश्यक आहे. ती पूर्ण करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अथक प्रयत्न करत आहेत. याचबरोबर ऑनलाईन अध्यापनाचे काम सुरु आहे. निकालाचीही कामे करावी लागत आहेत. शाळेत उपस्थितीत राहू न शकलेल्या शिक्षकांच्या कामात मदत करणे आणि अनुदानित शाळेतील प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. शाळा सुरु झाल्यानंतर कॅटलॉग, परीक्षा याद्या, मध्यान्ह भोजन रजिस्टर तयार करणे, विद्यार्थी पोर्टल भरणे यासारखी अनेक कामे करावी लागतात. त्यामुळे शिक्षकांना बीएलओचे दिलेले काम तत्काळ रद्द करावे', अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे.
शाळेत पोहचण्याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम
मुंबईतील शिक्षकांना शाळेत उपस्थितीसाठी लोकलद्वारे प्रवासाच्या सोईबाबत शासन स्तरावर सूचना दिल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात रेल्वेच्या खिडकीवर अद्यापही शिक्षकांना तिकिट नाकारण्यात येत आहे. त्यामुळे शाळेत कसे पोहचायचे? असा प्रश्न शिक्षकांसमोर उपस्थितीत झालेला आहे. त्यातच आता शाळा सुरू झाल्या आहेत. ऑनलाईन शिकवायचे आणि शाळेत उपस्थित कसे राहायचे? असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. लोकलची सेवा उपलब्ध नसल्याने शिक्षकांचा शाळेमध्ये ये-जा करण्यासाठी वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे वेळेत उपस्थित राहता येणार नाही. त्याचा परिणाम शिकवणीवर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - प्रताप सरनाईकांच्या पत्रातील आरोप गंभीर; सर्वांनी त्याचा अभ्यास करावा - संजय राऊत