मुंबई : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या बाबरी मज्जिद ढाचा कोणी पाडला? या वक्तव्यावरून राज्यात रान उठले आहे. बाबरी मज्जिद ढाचा पाडणारे शिवसैनिक नव्हते, ते कारसेवक होते असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मंत्री शंभूराजे देसाई यांनी या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी : चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत असे वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांची सरकारमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर या सरकारला बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही त्यांनी नाव घेऊनही असेही ठाकरे यांनी ठणकावले आहे. दरम्यान या संदर्भात आपण चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना या संदर्भात ते रामभक्त होते कुठल्याही पक्षाशी संबंधित नव्हते, मात्र हिंदू होते, असे मत पाटील यांचे आहे, अशी सारवासारव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणी करावी लागली आहे.
त्या घटनेत सहभागी असलेले लोक : तर या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई म्हणाले आहे की, त्या घटनेमध्ये सहभाग घेतलेले लोक हे मराठी बोलणारे होते, असे अडवाणी म्हणाले होते. जर ते मराठी बोलणारे असतील माझे शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे, हे बाळासाहेब जाहीरपणे म्हणाले होते. याप्रकरणी बाळासाहेब यांना लखनऊ न्यायालयातही जावे लागले होते. त्यामुळे त्या घटनेत सहभागी असलेले लोक हे हिंदू मराठी बोलणारे होते. शिवसैनिक होते हे नाकारून चालणार नाही, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.