मुंबईत अखेर लोकल सेवा सुरू, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांची बसच्या गर्दीतून सुटका - लोकल रेल्वे न्यूज
मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकलसेवा (उपनगरीय रेल्वे सेवा) आज पहाटे पासून सुरु करण्यात आली आहे. ही सेवा केवळ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठीच असणार आहे. पहाटे साडेपाच वाजता पहिली लोकल धावली.
मुंबई - मागील अडीच महिने अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी बसने प्रवास करत होतो. मात्र, आता लोकल सुरू झाल्यानंतर बसच्या गर्दीतून त्यांची सुटका झाली असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी बळीराम लिगम यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेले लिगम यांनी आज (दि. 15 जून) पश्चिम रेल्वेने प्रवास केला. ही सेवा सुरू झाल्याचे अद्याप महापालिकेकडून सूचित करण्यात आलेले नाही. मात्र, आज सकाळपासून लोकल सुरु झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बोरिवली स्थानकातून लोकल पकडल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या ही मोठी असताना, त्यानुसार बसच्या फेऱ्या वाढत नव्हत्या. त्यामुळे गर्दी होऊन सोशल डिस्टनसिंग पाळताना अडचण होत होती. मात्र, आता लोकल सुरू झाल्याने निदान सोशल डिस्टनसिंग पाळणे शक्य होणार आहे, असे ते म्हणाले.
मागील अडीच महिने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा बंद होती. अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे लावून धरली होती. अखेर रविवारी (दि. 14 जून) रात्री उशिरा अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्याला रेल्वेने मान्यता दिली.
त्यानुसार आज पहाटे 5.30 वाजता चर्चगेट ते विरार ही पहिली लोकल धावली. तसेच विरार येथूनही पहाटे 5.30 वाजता लोकल सोडण्यात आली. रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही सेवा असणार आहे. इतर कोणत्याही प्रवशाला प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. एका लोकलमध्ये केवळ सातशे प्रवाशांना प्रवेश दिला जाणार असून याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी रेल्वे पोलीस, जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांना प्रत्येक रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले आहे. पहाटे 5.30 ते रात्री अकरा दरम्यान तिन्ही मार्गावर 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
हेही वाचा - विविध कंपन्यांकडून मुंबई पालिकेला 46 रुग्णवाहिका भेट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण