मुंबई- लॉकडाऊन सुरू असून पावसाळ्याच्या कामाअंतर्गत अनेक ठिकाणी वृक्ष छाटणीला मुंबई महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात कंत्राटदाराकडून वृक्ष छाटणी वा वाढलेल्या धोकादायक फांद्या कापण्याऐवजी मोठ्या फांद्या कापण्यासह काही झाडे खोडातून कापली जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. शनिवारी दुपारी मुलुंड, एलबीएस रोड येथे अशा प्रकारे बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
आरे जंगलात वृक्षतोड सुरुच असून हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. तर आता दुसरीकडे पावसाळ्याआधी धोकादायक झाडाची छाटणी करण्यात येते. त्यानुसार वृक्ष प्राधिकरणाकडून तशी परवानगी देण्यात आली आहे. पण मुंबईत अनेक ठिकाणी कंत्राटदार छाटणी ऐवजी झाडांची कत्तल करत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींचा आहे.
मुलुंड, एलबीएस रोडवरील जॉन्सन अँड जोन्सन येथे झाडांची बेकायदा कत्तल होत असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी जिनेश दोशी यांना शनिवारी दुपारी मिळाली. त्यानी लागलीच तिथे धाव घेत हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे परवानगी पत्र मागितले. मात्र फक्त छाटणीची परवानगी असताना फांद्या आणि खोडही कापली जात असल्याचे दिसून आल्याचे जीनेशने सांगितले आहे. कंत्राटदार ऐकण्यास तयार नसल्याने जीनेशने थेट पालिकेच्या टी विभागात धाव घेतली. पण तिथे कुणीही अधिकारी नव्हते. त्यामुळे आता टी विभागात याविरोधात तक्रार नोंदवणार असल्याचे जीनेशने सांगितले आहे. दरम्यान या ठिकाणीहुन 6 ट्रक भरून ओंडके नेण्यात आल्याचा धक्कादायक आरोप ही पर्यावरणप्रेमी करत आहेत.