मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर नव्याने देण्यात आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल चिन्ह गोठवले जाणार आहे. निवडणूक आयोगाने कसबा, पिंपरी चिंचवड पोट निवडणूक म्हणजेच २६ फेब्रुवारीपर्यंत वापरण्यास मुभा दिली आहे. आयोगाने ठाकरे गटाला तशा सूचना दिल्या आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडून या निर्णयामुळे ठाकरेंची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
पोट निवडणुकीपर्यंत मुदत : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेली आहे. दुसरीकडे अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि चिन्ह मशाल यावर गंडांतर येणार आहे. निवडणूक आयोगाने कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडच्या पोट निवडणूक पार पडेपर्यंत ठाकरे गटाला मुदत दिली आहे. त्यामुळे ज्या ठाकरेंनी शिवसेनेची पाळेमुळे रोवली. त्याच ठाकरेंविना शिवसेना राहणार आहे. त्यामुळे आगामी निवडणूकसाठी उद्धव ठाकरे यांना नवे नाव आणि चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
म्हणून दिले होते मशाल : शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या दालनात गेले. आयोगाने ठाकरे आणि शिंदे यांच्याकडून पक्षाची तीन नाव आणि तीन चिन्ह प्रतिनिधिक स्वरूपात मागून घेतली. उद्धव ठाकरे आणि 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे', 'शिवसेना प्रबोधनकार ठाकरे', 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे', या तीन नावांचा आणि 'उगवता सूर्य', 'मशाल', आणि 'त्रिशूल' हे तीन पर्याय आयोगाकडे पाठवले. शिंदेंकडून तीन पर्याय सुचवण्यात आले. त्यानुसार निवडणूक आयोगाने शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव आणि 'ढाल आणि दोन तलवार' हे चिन्ह दिले. शिवसेना उद्धव ठाकरे यांना 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि 'मशाल' हे चिन्ह दिले होते.
नवे चिन्ह आणि पक्षाचे नाव पाठवणार : निवडणूक आयोगाने नुकतेच शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याने ठाकरेंना धक्का दिला. निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात जायची तयारी ठाकरे गटाने केली. तसेच, आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्धार केला. मात्र निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे विना मशाल हे चिन्ह आणि 'शिवसेना' (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव 26 फेब्रुवारी पर्यंतच वापरण्याची मुदत दिली आहे. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका असून नव्या पक्षाच्या नावाचा आणि चिन्हाचा पर्याय निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे. आता ठाकरे कोणतं नाव आणि चिन्ह आयोगाकडे पाठवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.