मुंबई Case Against Mahesh Sawant : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्मृतीस्थळाची पाहणी करण्यास आले असताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते यांच्यात राडा झाला होता. या राड्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात 50 ते 60 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सोमवारी ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना शिवाजी पार्क पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. दादरमधील ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्यासह दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळं आता ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे.
50 ते 60 अज्ञातांवर दंगलीचा गुन्हा : ठाकरे आणि शिंदे गटात जेव्हा हाणामारीच्या प्रसंग ओढावला होता, तेव्हा शिवाजी पार्क पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी तैनात झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद नियंत्रणात आणण्यात आला होता. शिवाजी पार्क पोलिसांनी या सर्व वादाचं चित्रीकरण केलं होतं. शिवाजी पार्क पोलिसांनी केलेल्या चित्रीकरण आणि घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनीच 50 ते 60 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी मुरकुटे यांनी दिली. सोमवारी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी पार्क पोलिसांनी नोटिसा बजावून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बोलावलं होते. महेश सावंत यांनादेखील नोटीस बजावून सोमवारी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं.
दोन्ही गटातील वाद आणखी पेटणार : शिवाजी पार्क पोलिसांनी काल मंगळवारी नवा गुन्हा दाखल केलाय. पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार महेश सावंत यांच्यासह आणखी दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्व संध्येला दादर परिसरात आले होते. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे हे आमदार सदा सरवणकर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शितल म्हात्रे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासह स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर काही वेळानं शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप शिंदे गटानं केलाय. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोपही शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी केला होता. मात्र, शिंदे गटानं केलेले आरोप ठाकरे गटानं फेटाळून लावले आहेत. आता ठाकरे गटाच्या तीन कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून देखील शिंदे गटाविरोधात तक्रार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळं या दोन्ही गटांतील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :