मुंबई : आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिले होते. तेव्हा आम्ही गडबडीत होतो तेव्हा इथे आलो. आणि तेव्हा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिल्याप्रमाणे आम्ही जात आहोत. कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहोत. त्यामध्ये कोणाला काही वाईट वाटण्याचे कारण नाही. आमची श्रद्धा आहे. भक्ती भावाने सर्व लोकांची इच्छा आहे, तिकडे परत जायची आणि जात आहोत. राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ द्या. जनता सुखी होऊ दे. राज्यावरील संकट दूर होऊ दे, यासाठीच आम्ही जात आहोत. आमचा दुसरा काही अजेंडा नाही आहे. जनतेच्या जीवनात अमुलाग्र बदल, सुख, समृद्धी, आनंद असू दे. राज्यातील जनतेला सुखी करावे, या भावनेने आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहोत. दलित पॅंथर गटाचे आम्हाला समर्थन दिले आहे. कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर दिली.
राज्यात सत्तांतर झाले आणि त्याचे मुख्य केंद्रस्थान राहिले ते म्हणजे गुवाहाटी. याप्रसंगी गुवाहाटीमधील कामाख्या देवीला केलेला नवस फेडण्यासाठी एकनाथ शिंदे व त्यांची टीम आज पुन्हा गुवाहाटीला जात (Eknath Shinde Group Guwahati Tour) आहे. सत्तांतराच्या केंद्रस्थानी राहिलेल्या या गुवाहाटीचे स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांच्यासाठी वेगळेच होते. म्हणून हे सर्व शिंदे समर्थक आमदार खासदार गुवाहाटीला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर एकत्रित जमले (MLA MP arrive at airport) आहेत.
सत्तांतरानंतर पहिला दौरा : राज्यात सत्तांतर व्हावं व ते झाल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षाचे आमदार आणि खासदार कुटुंबासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे सगळे याठिकाणी जात असून मुंबई विमानतळावर ते एकत्रित जमले आहेत. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी तसेच त्यांचे पूर्ण कुटुंब विमानतळावर पोहोचले (Guwahati Tour for Kamakhya Devi darshan) आहे.
काही मंत्री, आमदार अनुपस्थित : दरम्यान काही आमदार आणि मंत्री या दौऱ्याला गैरहजर राहणार आहेत. मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री तानाजी सावंत, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, लताताई सोनवणे, उदय सामंत शिंदे गटातील हे आमदार आणि मंत्री गुवाहाटी दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार आणि मंत्री नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आमदार सुहास कांदे तसेच आमदार संजय शिरसाट हे गुवाहाटीला जाणार नाहीत ते नाराज आहेत, अशा चर्चा उपस्थित झाल्या होत्या. परंतु हे दोन्ही आमदार विमानतळावर दाखल झाले असून कुठल्याही प्रकारची नाराजी नसल्याचे त्यांनी सांगितले (Eknath Shinde Group Guwahati Tour) आहे.
भाजप नेते गुवाहाटीला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व त्यांच्या समर्थक आमदारांसोबत भाजपचे नेते व मंत्रीही त्यांच्यासोबत गुवाहाटीला जात आहेत. मंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा विमानतळावर पोहोचले असून, मुख्यमंत्र्यांनी काल मला फोन करून गुवाहाटीला येण्याच आमंत्रण दिले म्हणून मी त्यांच्यासोबत जात आहे, असे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर भाजप नेते मोहित कंबोज हे सुद्धा विमानतळावर दाखल झाले. तेही या सर्व आमदार, खासदारांसोबत गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. विशेष म्हणजे राज्यात झालेल्या नाट्यमय संतांतराच्या दरम्यान मोहित कंबोज हे सुद्धा शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांसोबत त्यादरम्यान गुवाहाटीला होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदार, खासदार यांचा मुक्काम आज गुवाहाटीला असणार आहे तर ते उद्या मुंबईत परतणार आहेत.
काय म्हणाले खासदार श्रीकांत शिंदे? याप्रसंगी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, टीकाकरांचे कामचं आहे टीका करणे, हा श्रद्धेचा भाग आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात राज्यात योग्य दिशेने वाटचाल होत आहे. जनतेची काम होत आहेत व ती काम अशीच होत राहो. गतीने हे सरकार पुढे जाईल. कामाख्या देवीच्या चरणी आम्ही नवस केला होता व ती तो नवस फेडण्यासाठी मातेचे आभार मानण्यासाठी आम्ही गुवाहाटीला जात आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.