मुंबई - मनी लाँडरिंगच्या संदर्भात टॉप्स ग्रुपची ईडीकडून तपास केला जात असताना ईडीकडून अभिनेते राज कपूर यांचा नातू अभिनेता अरमान जैन याला चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक आणि त्याचा मुलगा विहंग यांची ईडीकडून मनी लाँडरिंगसंदर्भात चौकशी सुरू आहे. या प्रकरणात चौकशीदरम्यान अरमान जैन यांचे नाव समोर आल्यामुळे दक्षिण मुंबईतील त्यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली होती. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि करिना कपूर यांचा आत्येभाऊ म्हणून अरमान जैन ओळखला जातो. अरमान राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा मुलगा आहे. शिवसेना आमदार सरनाईक यांच्या कार्यालयावर व घरावर ईडीकडून याअगोदर छापेमारी करण्यात आली आहे. यानंतर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग याची चौकशी केली जात असताना अरमान जैन यांचे नाव समोर आले आहे.
या कारणामुळे मिळाले समन्स
विहंग सरनाईक याची दोन वेळा ईडीकडून चौकशी करण्यात आल्यानंतर त्याच्या मोबाईल फोनमध्ये अरमान जैन व विहंग सरनाईक या दोघांच्या दरम्यान संशयास्पद व्हॉटसअॅप चॅट झाल्याचे ईडी अधिकार्यांचे म्हणणे आहे. टॉप्स सिक्युरिटीकडून एमएमआरडीएला सुरक्षारक्षक पुरविण्याच्या नावखाली 150 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर यासंदर्भात चौकशी करण्यात येत आहे. यासंदर्भात ईडीकडून प्रताप सरनाईक यांचा जवळचा सहकारी अमित चांदोले यास अटक करण्यात आलेली आहे.
राज कपूर यांचा नातू अरमान जैन याने बॉलीवूडमधील 'लेकर हम दीवाना दिल' या चित्रपटात काम केले असून स्टुडन्ट ऑफ दि इयर, माय नेम इज खानसारख्या चित्रपटात सहदिग्दर्शक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले आहे.