मुंबई : सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. आयएल अँड एफएस प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना उद्या हजर राहण्याची सूचना नोटीसमध्ये करण्यात आली आहे.
ईडीने आयएल अँड एफएसशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कोहिनूर कन्स्ट्रक्शनला दिलेल्या कर्जासंदर्भात राज ठाकरे यांचीही चौकशी केली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अनेक कंत्राट मिळाली होती. त्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा ईडीला संशय आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी जयंत पाटलांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र जयंत पाटील यांनी मला कोणतीही नोटीस आली नसल्याचे म्हटले आहे.
सोमवारी होणार चौकशी- ई़डीने यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, नवाब मलिक यांना नोटीस पाठविली. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनादेखील ईडीची नोटीस मिळाल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला शह देण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याची चर्चा आहे. उद्या जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. मात्र, आता या नोटीसवर जयंत पाटील काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, राजकीय वर्तुळात चर्चा- महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा आज निकाल येणार आहे. त्याचवेळी ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जयंत पाटील यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना धक्का बसला आहे. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप करण्यात आला होता.
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर झाले होते भावूक- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील भावूक झाले होते. अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेऊन मार्गदर्शन करावे, असा त्यांनी आग्रह धरला होता. शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याबाबत मुंबईतील बैठकीला जयंत पाटील गैरहजर होते. त्यावर बैठकीला निमंत्रण मिळाले नसल्याचे पाटील यांना माध्यमांना सांगितले होते. त्यावरून जयंत पाटील यांना पक्षात एकटे पाडण्यात येत असल्याच्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या.
कंपनीच्या दोन मालमत्तांची झडती- दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात या प्रकरणासंदर्भात जयंत पाटील यांचा जबाब घेतला जाण्याची शक्यता आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि फायनान्स कंपनीतील कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने बुधवारी आयएल अँड एफएस- बीएसआर आणि असोसिएट्स आणि डेलाईट हस्किन्स आणि सेल्स कंपनीच्या येथे झाडाझडती घेतली. पीएमएलए तरतुदींनुसार मुंबईतील दोन लेखापरीक्षकांशी जोडलेल्या मालमत्तांची झडती घेण्यात आली, असेही सूत्रांनी सांगितले
आयएल अँड एफची सुरू आहे चौकशी- डेलॉइटच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही नियमित चौकशी जुन्या प्रकरणाशी संबंधात सुरू असलेल्या प्रकरणाशी संबंधित आहे. आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत, असे डेलॉइटच्या प्रवक्त्याने सांगितले. आयएल अँड एफएस फायनान्शिअल सर्व्हिसेसचे दोन्ही माजी लेखा परीक्षक असलेल्या दोन कंपन्यांविरुद्ध चौकशी रद्द करणारा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यानंतर एका आठवड्यानंतर ही कारवाई झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कंपनी कायद्यांतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला. आयएल अँड एफएसने 2018 मध्ये दिवाळखोरीसाठी अर्ज केला. सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस (SFIO) ही कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक एजन्सी आहे. या एजन्सीकडून आयएल अँड एफएसने चौकशी सुरू आहे.
हेही वाचा-
Maharashtra Political Crisis : आमदारकी संकटात असलेले 'ते' 16 आमदार कोण?