मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली या ठिकाणी साई रिसॉर्ट हे हॉटेल आहे. या संदर्भातील नियमबाह्य जे काम झालेले आहे, त्यामुळेच खासदार किरीट सोमैय्या यांनी गेल्या वर्षभरापासून याबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याबाबतची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. अखेर ईडीने एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना अटक केलेली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचा देखील संबंध आहे, असा आरोप सोमैय्या यांचा आहे.
साई रेसॉर्टबाबत झालेला घोटाळा : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जिल्ह्यातील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकाम आणि संशयास्पद खरेदी-विक्री प्रकरण राज्यात अनेक दिवसांपासून गाजत आहे. भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक पार्टनर आहेत. 'ईडी'ने त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. साई रेसॉर्टबाबत जो काही घोटाळा झालेला आहे, त्याचा अनिल परब यांनी स्वतःचा काही संबंध नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. अनिल कदम यांचा व्यवहार सदानंद कदम यांच्याशी झाला. हा व्यवहार कागदोपत्री झाल्यामुळे त्याचे सगळे दस्तावेज उपलब्ध आहेत, असे देखील अनिल परब यांनी काही दिवसापूर्वी स्पष्ट केले होते.
ईडीच्या कोठडीमध्ये चौकशी : मात्र अंमलबजावणी संचालनालयाला साई रिसॉर्ट याबाबतचे बांधकाम हे बेकायदा असल्याचा संशय आहे. त्याबाबतची तक्रार त्यांच्याकडे प्राप्त झाली आहे. सदानंद कदम हे एक उद्योजक आहेत. अटकेनंतर त्यांना मुंबईला ईडीच्या कोठडीमध्ये चौकशी करण्यासाठी तुरुंगवास मिळावा, अशी मागणी मुंबईच्या सत्र न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यानंतर ईडीच्या या विनंती अर्जावर न्यायालयाने 15 मार्चपर्यंत आता सदानंद कदम यांना तुरुंगात धाडलेले आहे. त्यांना घरातून जेवण आणि मेडिकल पुरविले जाईल, तसेच चौकशीदरम्यान त्यांचा वकिल त्यांच्यासोबत हजर राहू शकतो, अशी कोर्टाने परवानगी दिली आहे.