मुंबई - कोविड काळात देशातील अनेक राज्यातील सरकारने जनतेला मदत केली. पण महाराष्ट्र सरकारने जनतेला काहीच दिले नाही. या उलट या काळात खोटी बिले देण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे, असा आरोप भाजपचे नेते अतुल भातखलकर यांनी केला आहे.
सरकारने दिली खोटी बिले -
कोरोना काळात आमच्याकडे पैसे नाहीत, असे राज्य सरकार सांगत होते. परंतु या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाची 70 ते 80 कोटींचे खोटी बिले देण्यात आली. तसेच माझ्याकडे याचे पुरावे आहेत, असेही भातखलकर यांनी म्हटले.
हा मोठा भ्रष्टाचार -
पाच वर्ष अगोदर जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते, त्यावेळी बांधकाम विभागाची मुंबईतील अनेक बिले आता या सरकारमध्ये दिली दिली गेली आहेत. ही बिले खोटी असल्याने भाजप सरकारने थांबवून ठेवले होते. तसेच यावर चौकशीही सुरू होती. पण तरीही या सरकारने ही बिले दिली. त्यामुळे यामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील भातखळकर यांनी केला.
बांधकाम विभागात कमिशन ठरले होते -
ही बिले देताना बांधकाम विभागात 35% कमिशन ठरलेले होते. त्यामुळे ही बिले देण्यात आली. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ, असेही त्यांनी म्हटले.
हे कायद्याच नसून गावगुंडाच राज्य -
औरंगाबादमधील एका बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, पोलीस आयुक्तांनी त्यांना क्लीन चीट दिली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील तो पदाधिकारी निर्दोष असल्याचे विधान केले. राज्यात महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्या सरकारमधील नेते अशी टिपणी करत आहेत. त्यामुळे हे कायद्याचे नसून गावगुंडांचे राज्य आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी केली.
हेही वाचा - फायजर, बायोएनटेक कंपनीच्या कोरोना लसीला WHOची परवानगी