मुंबई - केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी)तर्फे सनदी अधिकारी पदासाठी रविवारी ४ ऑक्टोबर रोजी देशभरात आयोजित करण्यात येत असलेल्या पूर्व (प्रीलिम्स) परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची मोठी वाहतूक कोंडी मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत रेल्वे प्रशासनाने मुंबईतील तिन्ही महामार्गावर रेल्वे मेगा ब्लॉक घेतला असून दुसरीकडे बेस्ट आणि एसटी महामंडळाने ही या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मुभा देण्यासंदर्भात कोणताही निर्णय जाहीर केला नाही यामुळे रविवारी होत असलेल्या यूपीएससीच्या या परीक्षेला विद्यार्थ्यांची मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यूपीएससीची ही पूर्व परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यातच मुंबई, नवी मुंबईमध्ये यूपीएससीच्या या पूर्व परीक्षेसाठी सर्वाधिक परीक्षा केंद्र असतानाही आतापर्यंत या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना लोकल सोबतच बेस्ट आणि एसटी महामंडळाच्या सार्वजनिक वाहतूक सेवेच्या संदर्भात स्थानिक प्रशासनाने कोणताही निर्णय जाहीर केला नाही. यामुळे पूर्व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे पुण्यातील युनिक अकॅडमीचे केतन पाटील आणि मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य व यूपीएससी परीक्षेचे प्रशिक्षक डॉक्टर बाळासाहेब साळवे यांनी सांगितले.
यूपीएससीच्या या पूर्व परीक्षेला देशभरातून सुमारे सात लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत तर महाराष्ट्रातील ही संख्या एक लाखाहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये मुंबई नवी मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर ही प्रमुख परीक्षा केंद्र असून यामध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांची संख्या आहे पुणे मुंबई आणि नवी मुंबई येथील परीक्षा केंद्रावर आहे. रविवारी सकाळी ७ ते ११ आणि दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रांमध्ये यूपीएससीच्या या परीक्षा होत आहेत. या परीक्षेसाठी मुंबई नवी मुंबई आणि पुण्यामध्ये पहाटेपासूनच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सोय केली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने यासाठी लक्ष घालून या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची सोय करावी अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.
राज्यात सर्वाधिक यूपीएससीचे विद्यार्थी हे पुण्यामध्ये असून पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रादुर्भाव झाल्याने विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या विद्यार्थ्यांची तत्काळ सोय करावी अशी मागणी एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी केली. यूपीएससीच्या मुंबई आणि परिसरात होणाऱ्या परीक्षेसाठी आतापर्यंत रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना आम्हाला आल्या नसल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तर अशीच माहिती बेस्ट आणि एसटी महामंडळाकडून ही देण्यात आली.