मुंबई - देशाचे माजी अर्थमंत्री व वरिष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांच्या निधनाने अभ्यासू राजकारणी व निष्णात कायदेतज्ञ काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
जेटली यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना आ. थोरात म्हणाले की, यशस्वी वकील असलेल्या अरुण जेटली यांनी सक्रिय राजकारणातही चांगले योगदान दिले. खासदार, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते, माहिती व प्रसारण राज्यमंत्री, अर्थमंत्री आदी महत्त्वाच्या जबाबदाऱया त्यांनी भूषवल्या. सखोल अभ्यास, विषयाची मुद्देसूद मांडणी करण्याचे त्यांचे विशेष कौशल्य होते. स्वपक्षातील नेत्यांसोबतच विरोधी पक्षांतील नेत्यांशी त्यांचा उत्तम संवाद होता.
जेटली यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना आपण कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.