ठाणे : शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाण्यात बालेकिल्ल्यात फूट पडल्याने दोन गट निर्माण झाले आहेत. यामुळे गटात कुठे जायचे यावरून संभ्रम निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात ठाण्यातील नौपाडा भागातील विभाग प्रमुख प्रकाश पायरे हे सकाळी राजन विचारे यांच्यासोबत दिवाळी पहाट कार्यक्रमात दिसले तर काहीच वेळानंतर प्रकाश पायरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाश्ता करताना दिसले. एकूणच या परिस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे.
संघर्ष पाहायला मिळाला: शिवसेनेच्या अंतर्गत बंडामुळे राज्याची सत्ता बदल झाली आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेतल्या या बंडपणामुळे शिवसेनेचे दोन गट झाले आहेत आणि या दोन गटांमध्ये आतापर्यंत अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, ठाण्यात असेही कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत जे सकाळी एका गटासोबत आहेत तर संध्याकाळी दुसऱ्या गटासोबत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कोणत्याही व्यक्तीला दुखावता येऊ शकत नसल्याने कार्यकर्त्यांनी आपला नेत्यांची असलेला संपर्क ठेवूनच वसंत केला आहे. एकीकडे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत तर दुसरीकडे काही कार्यकर्ते दोन्ही गटांमध्ये आपला संपर्क ठेवून आपले व्यक्तिगत हित साधत आहेत.
कार्यकर्त्यांनी घेतली बघ्याची भूमिका: दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा पाहून एकमेकांच्या विरोधात तयार झालेले वातावरण लक्षात घेऊन वाद टाळण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसेच त्यांनी कोणत्याही गटात न जाणे पसंत केले आहे.
शाखा शाखांमध्ये झाले दोन गट: ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि येथे सर्वात जास्त शिवसेनेचे शाखा मध्यवर्ती शाखा आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा आनंदाश्रम आहे. या सर्वच ठिकाणी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे उठणे बसणे सुरू असते आणि यामुळेच अनेकदा वादही होत आहेत. पोलिसांच्या कारवाईला लक्षात घेऊन भविष्यातही हा वाद विकोपाला जाईल हेच पाहायला मिळत आहे.